
तिकीटावरून सापडला खूनी; ३६ तासात वसई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
वर्षभराच्या प्रेमसंबंधानंतर बंगाली महिलेची केली निर्घूण हत्या
नालासोपारा: नायगाव पूर्व केळीचापाडा येथे बंगाली महिलेची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला घटनास्थळावर सापडलेल्या तिकिटावरून छडा लावून 36 तासांत पकडण्यात वालीव पोलिसांना यश आले. या आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 'बिगो अँप'द्वारे महिलेशी प्रेमसंबंध जुळवून, एक वर्षाच्या प्रेम सबंधानंतर पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. यात तिकीटाचा पुरावा महत्त्वाचा ठरला. (
तिकीटावरून 'असा' पकडला आरोपी
इस्माईल मकसूद खान (वय 30) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. महेबुबा शेख असे हत्या केलेल्या बंगाली महिलेचे नाव आहे. 9 जुलै रोजी नायगाव पूर्व केळीचा पाडा येथील चाळीच्या घरातील बाथरूममध्ये बंगाली महिलेचा मृतदेह सापडला. पोलीस तपासा दरम्यान त्याच ठिकाणी पोलिसांना एक रेल्वेचे तिकीट सापडले. या तिकिटांचा आधार घेत, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी स्वतंत्र पथक तयार करून, त्यामार्फत आरोपीचा आधी मोबाईल नंबर शोधून काढला. त्यावरून आरोपीची ओळख समजली. आरोपी उत्तर प्रदेश येथील बागपत राठोड गावात पळून गेला असल्याचे तिकीटावरून स्पष्ट झाले. तात्काळ पथक पाठवून राठोड गावात सापळा रचण्यात आला आणि आरोपी उसाच्या शेतात पळून जाताना पाठलाग करून त्याला पकडण्यात आले.
आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी आणि बंगाली महिलेची बिगो अँपद्वारे चॅटिंगमध्ये प्रथम ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. एक वर्षे प्रेमसंबंध जुळल्या नंतर महिलेने लग्नाची मागणी केली. जर लग्न केले नाही तर तुझ्या उत्तर प्रदेशच्या घरी येईन, अशी धमकी तिने दिली. तसेच, ती वारंवार पैशाची मागणी करत असल्याने आरोपी उत्तर प्रदेशातून वसई-नायगावमधील ती महिला राहत असलेल्या ठिकाणी आला. तेथे ते एकत्र राहत असताना पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादात राहत्या घरीच आरोपीने तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह बाथरुममध्ये फेकून दिला. त्यानंतर आरोपी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आणि तिकीटावरून त्याचा शोध लागला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.