किशोरी पेडणेकर यांचा नर्स ते महापौरपदाचा प्रवास!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

नर्स म्हणून नोकरी

- 2002 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक

- 2012 आणि 2017 मध्ये पुन्हा नगरसेविका

मुंबई : मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. मुंबईतील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. त्यांनी सुरवातीला परिचारिका (नर्स) म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर आता त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यातून ते प्रचंड मतांनी निवडून आले. यामध्ये किशोरी पेडणेकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे पेडणेकर यांचा महापौरपदासाठी 'मातोश्री'कडून विचार करण्यात आला. त्यांनी मुंबईच्या 77 व्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला. 

नर्स म्हणून नोकरी

किशोरी पेडणेकर या जेएनपीटीमध्ये नर्स म्हणून नोकरी करत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या पेडणेकर यांनी 1992 पासून पक्षाचे काम निष्ठेने सुरु केले. रुग्णसेवा देत असताना एक शिवसैनिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. 

विभाग संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क म्हणून काम

किशोरी पेडणेकर यांनी उपविभाग संघटक, विभाग संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क संघटक अशा पदांवर काम केले. सध्या त्या रायगड जिल्हा व शिर्डी महिला संपर्क संघटक अशा जबाबदारी सांभाळत आहेत. 

2002 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक

शिवसेनेच्या उपविभाग संघटक, विभाग संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क संघटकपदी काम केलेल्या किशोरी पेडणेकर 2002 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांना प्रभाग समिती अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदाचा कार्यभारही सोपविण्यात आला. 

2012 आणि 2017 मध्ये पुन्हा नगरसेविका

2007 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र, 2012 आणि 2017 मध्ये त्या पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2012 मध्ये त्यांनी शहर स्थापत्य समिती अध्यक्षा, सुधार-स्थायी समिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kishori Pednekar journey from Nurse to Mayor