पालिकेच्या छोट्या रुग्णालयात पहिले गुडघे प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई  - विक्रोळी येथील कन्नमवारनगरातील महापालिकेच्या छोट्याशा महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात प्रथमच गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अवघ्या 60 हजारांत झाली. विक्रोळीतील लक्ष्मण सोरटे (वय 66) या रुग्णावर ती करण्यात आली. यामुळे अशा प्रत्यारोपणाची वाट पाहणाऱ्या 50 हून अधिक रुग्णांना दिलासा मिळाला.

मुंबई  - विक्रोळी येथील कन्नमवारनगरातील महापालिकेच्या छोट्याशा महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात प्रथमच गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अवघ्या 60 हजारांत झाली. विक्रोळीतील लक्ष्मण सोरटे (वय 66) या रुग्णावर ती करण्यात आली. यामुळे अशा प्रत्यारोपणाची वाट पाहणाऱ्या 50 हून अधिक रुग्णांना दिलासा मिळाला.

तीन वर्षांपासून लक्ष्मण सोरटे यांना गुडघेदुखीचा त्रास होता. तीन-चार रुग्णालयांत त्यांनी प्रत्यारोपणासाठी प्रयत्न केले. एका पायाला कमीत कमी एक लाखाचा खर्च सांगण्यात आला. पालिकेच्या केईएम रुग्णालयातही 90 ते 95 हजारांचा खर्च सांगितला होता, असे त्यांचे भाऊ रामचंद्र सोरटे (वय 70) यांनी सांगितले. घरात कमावते कुणीही नसल्याने आर्थिक बाजू सांभाळून शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर फुले रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागाचे डॉ. उमेश पाटील यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

ही शस्त्रक्रिया रुग्णालयातील डॉ. उदय मौर्या या मानद डॉक्‍टरांच्या उपस्थितीत डॉ. उमेश पाटील, डॉ. प्रमोद सर्केलवाड, शस्त्रक्रिया विभागातील दोन परिचारिका आणि तीन सहायकांनी केली. या आधी डॉ. पाटील यांनी 50 हून अधिक गुडघे बदलाच्या शस्त्रक्रिया अन्य रुग्णालयांत केल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात अत्यंत कमी सुविधांमध्ये शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ होती. 9 डिसेंबरला शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन दिवसांत सोरटे चालू लागले.

शस्त्रक्रियेची पद्धत

गुडघे प्रत्यारोपणासाठी गुडघ्याच्या दोन हाडांमध्ये वापरण्याचे साहित्य महत्त्वाचे असते. यासाठी पॉली इथिलीन वापरतात. मात्र ते लवकर खराब होते. त्यामुळे मेटल ऑन पॉली मटेरियल वापरण्यात आले. या मटेरियलसाठी डॉक्‍टरांनी दोन-तीन कंपन्यांशी संपर्क साधून कमी किमतीत मटेरियल देण्याची विनंती केली.

नवीन यंत्र देण्यात दिरंगाई

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी ड्रिलिंग महत्त्वाचे असते. रुग्णालयात हे यंत्र आहे, पण त्याचा वेग खूपच कमी आहे. नवीन यंत्रासाठी काही महिन्यांपूर्वीच अर्ज दिला आहे. मात्र अद्याप ते मिळालेले नाही. त्यामुळे डॉक्‍टर स्वतःचेच यंत्र वापरत असल्याचे कळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: knee implant in municipal hospital