भूमाफियांचा हैदोस; अतिक्रमण पथकावरच केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 मार्च 2020

भूमाफियांनी मनपाच्या पथकाच्या जेसीबीवर हल्ला करून त्याची काच फोडली व अधिकाऱ्यांनादेखील धक्काबुक्की केली.

मिरा रोड : काशीमिरा भागातील मांडवीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर भूमाफियांनी पालिकेचे रस्ते व आदिवासी नागरिकांच्या जमिनीवर अतिक्रमणे केली आहेत. याबद्दल बुधवारी (ता. ४) महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून सदर अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. या वेळी काही भूमाफियांनी मनपाच्या पथकाच्या जेसीबीवर हल्ला करून त्याची काच फोडली व अधिकाऱ्यांनादेखील धक्काबुक्की केली. याप्रकरणी मनपाकडून काशीमिरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी दिली.

ही बातमी वाचा ः तो म्हणाला हे काय किती पिंपल्स, तुझ्या पेक्षा मेहुणी बरी, एवढ्यावरूनच तिनं...
भूमाफिया मनोज चव्हाण व त्याच्या साथीदारांनी अतिक्रमणविरोधी पथकास कारवाईदरम्यान शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेकदेखील केली. हा हल्ला अधिकाऱ्यांनी चुकवला; मात्र पथकाच्या जेसीबीची काच या हल्ल्यात फुटली.ही दगडफेक करणाऱ्यांमध्ये बेबी कमलाकर जाधव, अहमद शेख, राम शर्मा, हरी, किशन व अब्दुल यांच्यासह इतर १५ जणांचा समावेश आहे. या सर्वांनी प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे, कनिष्ठ अभियंता संदीप साळवे यांच्यासह पालिकेचे आठ कर्मचारी, एक पोलिस निरीक्षक व १० पोलिस कर्मचारी आणि पालिकेचे १९ बाऊन्सर या सर्वांवर मौजे काशीमिरामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत असताना दगडफेक केली. याप्रकरणी प्रभाग अधिकारी बोरसे यांनी काशीमिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

हा प्रकार अतिशय निंदनीय असून भूमाफियांवर योग्य ती कारवाई होईल, तसेच यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त घेऊन कारवाईदेखील करण्यात येईल.
- चंद्रकांत डांगे, आयुक्त, मिरा-भाईंदर मनपा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landmines Attack on Invasion Squad