अबब...एवढा माेठा मासा जाळ्यात?

अभय आपटे
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

देवमुशी'ला पाण्यात सोडले, त्या वेळी त्याने पाण्यात उसळी मारली. त्यानंतर तो खोल समुद्रात निघून गेला. तो सुमारे 15 ते 20 फूट लांब होता. त्याचे वजन अंदाजे 1500 किलो होते, असे मच्छीमार साळावकर यांनी सांगितले. 

रेवदंडा : मुरूड-जंजिरा तालुक्‍यातील साळाव येथील मच्छीमारांच्या जाळ्यात गुरुवारी पहाटे भला मोठा मासा सापडला... या लाखोंच्या लॉटरीमुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला... परंतु तो संरक्षित आणि दुर्मीळ प्रजातीतील देवमुशी नावाचा मासा असल्याची माहिती मिळाल्यानंतर मच्छीमारांनी त्याला पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिले. 

धक्कादायक : म्हणली मुलांना कपडे घेउन येते...

साळाव नाका येथील मच्छीमार मनोहर साळावकर (53) हे जेजुरी नौकेतून कुंडलिका खाडीच्या पुढे समुद्रात अविनाश सारंग आणि सुनील खेदू यांच्या साथीने मासेमारी करत होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या जाळ्यात एक भला मोठा मासा सापडला. त्यामुळे लाखोंची कमाई होईल या विचाराने ते खूपच आनंदित झाले. ते त्याला घेऊन रेवदंडा जेट्टीवर आले. त्या वेळी सकाळच्या लख्ख उजेडात आपल्याला सापडलेले घबाड हे साधेसुधे नाही, हे त्यांच्या लक्षात आले. जेट्टीवरील उपस्थित मच्छीमारांनीही हा मासा "देवमुशी' (बहिरी) असून तो संरक्षित जीवांपैकी आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी पैशांचा मोह सोडून त्याला साडेनऊ वाजताच्या सुमारास पुन्हा समुद्रात सोडले. 

हा मासा ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर असतो. तो बदलत्या हवामानामुळे गुजरात आणि महाराष्ट्र किनारी कधी तरी येतो, असे मच्छीमारांनी सांगितले. 

"देवमुशी'ला पाण्यात सोडले, त्या वेळी त्याने पाण्यात उसळी मारली. त्यानंतर तो खोल समुद्रात निघून गेला. तो सुमारे 15 ते 20 फूट लांब होता. त्याचे वजन अंदाजे 1500 किलो होते, असे मच्छीमार साळावकर यांनी सांगितले. 

याबाबत गुजरातमधील मत्स्य-अभ्यासक चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर हा मासा आला असावा. तो आक्रमक असतो. उसळी मारताना नौकेची नासधूस करू शकतो. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर त्याचे प्रमुख भक्ष्य कोळंबी असते. तो रत्नागिरी किनाऱ्यापर्यंत पोहोचतो. 

देवमुशी माशाची जाळ्यातून सुटका केली, त्या वेळी त्यांनी मारलेली उडी ही थक्क करणारी होती. सुमारे 33 वर्षांच्या मच्छीमार व्यवसायातील हा वेगळा अनुभव होता. 
- मनोहर साळावकर, मच्छीमार, साळाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A large fish was found in the fishermen's net at Salav in Murud-Janjira taluka on Thursday morning.