तळा पंचायत समितीच्या छताला गळती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

तालुक्‍यातील पंचायत समितीच्या इमारतीला पावसामुळे गळती लागल्याने पंचायत समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

तळा (बातमीदार) : तालुक्‍यातील पंचायत समितीची इमारत ही तळा तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर आहे. गेल्या वर्षापासून या इमारतीला पावसामुळे गळती लागल्याने पंचायत समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

प्रशासन विभागाची ही इमारत दुमजली असून तळमजल्यावर तळा तहसील कार्यालय आणि वरच्या मजल्यावर पंचायत समिती अशा १० ते १२ दालनांची ही प्रशस्त इमारत १० वर्षांपूर्वी बांधण्यात आली. या इमारतीला गेल्या वर्षापासून गळती लागली आहे. मात्र, या वर्षी मुसळधार पावसामुळे जवळपास सगळ्याच दालनात पाणी आले आहे. त्‍यामुळे कपाटे, फर्निचर यांची पुरती वाट लागली आहे. शिवाय, पावसाच्या पाण्याने संगणक नादुरुस्त झाले आहेत. अनेक संगणक तर निकामी झाले आहेत. नागरिकानांही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे

कर्मचाऱ्यांना गळक्‍या स्लॅबखाली बसून पावसाचे पाणी अंगावर झेलावे लागत आहे. पाणी दालनात आल्याने अनेकांना तर खुर्चित बसणेही अवघड झाले आहे. या इमारतीकडे गेल्या वर्षी गळती होताच उपाययोजना करणे गरजेचे होते; परंतु तात्पुरती मलमपट्टी याबाबतीत कुचकामी ठरत आहे. यासाठी इमारतीवर सर्व बाजूंनी पत्रे टाकणे आवश्‍यक आहे. इमारतीची व्याप्ती पाहता खर्चसुद्धा तितकाच मोठा आहे. आमदार अनिकेत तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या कामी लक्ष घालून या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leakage in Tala Panchayat Samiti's office