म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांसाठी लवकरच सोडत; सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे

तेजस वाघमारे
Sunday, 11 October 2020

म्हाडाच्या कोकण मंडळाने विविध ठिकाणच्या घरांची सोडत काढण्याची हालचाल सुरू केली आहे.

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने विविध ठिकाणच्या घरांची सोडत काढण्याची हालचाल सुरू केली आहे. या सोडतीमध्ये सुमारे एक हजार घरांचा समावेश करण्यात येणार असून, त्यामध्ये बहुतांश घरे ही पंतप्रधान आवास योजनेतील असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले. 

सोडतीची तयारी सुरू असून, गृहनिर्माणमंत्री, म्हाडा उपाध्यक्ष यांच्या मान्यतेनंतर ही सोडत काढण्यात येणार आहे. दिवाळी किंवा त्यापूर्वी ही सोडत काढण्याचे मंडळाचे नियोजन आहे. 

हेही वाचा - हजला पाठवण्याच्या नावाखाली 47 जणांची फसवणूक; ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात गुन्हा

लॉकडाऊननंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर म्हाडाच्या विविध मंडळांनी घरांच्या सोडती काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे मंडळापाठोपाठ आता म्हाडाच्या कोकण मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली आहे. मंडळाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कल्याण येथील खोणी, शिरढोण येथे उभारलेल्या घरांची सोडत काढण्याचे ठरवले आहे. या घरांचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून, घरांची सोडत काढण्यात येणार आहे. सुमारे एक हजार घरांची ही सोडत असून, यामध्ये कोकण मंडळाच्या हद्दीतील इतर काही ठिकाणांचाही समावेश असणार आहे. 

दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्‍यच; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती - 

गृहनिर्माण मंत्री आणि म्हाडा उपाध्यक्ष यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच मंडळ सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करेल, असे मंडळातील विश्‍वसनीय अधिकाऱ्याने सांगितले. तसेच पालावा येथील खासगी विकसकांकडून सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होणारी 20 टक्के योजनेतील घरांचे काम लॉकडाऊनमुळे रेंगाळले आहे. त्यामुळे येथील घरे या सोडतीमध्ये समाविष्ट केली नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaving soon for MHADAs Konkan Mandal houses Houses under Pradhan Mantri Awas Yojana in the draw