'लेट्स रिड' - निराशेने भरलेल्या सरत्या वर्षात दमदार वाचन चळवळ

विनोद राऊत
Thursday, 31 December 2020

पुस्तक वाचन, लेखनापासून भरकटलेल्या लोकांना परत वाचक बनवले आहे. निराशेने भरलेल्या सरत्या वर्षात 'लेट्स रिड' ही दमदार वाचन चळवळ ठरली आहे.

 

मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या एका अनाथालयात एक गाडी थांबते, या गाडीतून एक सरप्राइज गिफ्ट लहान मुलांच्या हाती पडतं आणि त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य फुलतं. हे गिफ्ट म्हणजे पुस्तक होत. वाचन संस्कृतीची पाळमुळं अधिक घट्ट रुजवण्यासाठी  'लेट्स रिड' फाउंडेशनने सुरु केलेल्या या वाचन मोहीमेने अनेकांचे लक्ष वेधून तर घेतलंच, पण अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. पुस्तक वाचन, लेखनापासून भरकटलेल्या लोकांना परत वाचक बनवले आहे. निराशेने भरलेल्या सरत्या वर्षात 'लेट्स रिड' ही दमदार वाचन चळवळ ठरली आहे.

'लेट्स रिड' मागची संकल्पना 

मोबाईल, इंटरनेट, सोशल माध्यमांमुळे पुस्तक आणि दर्जेदार वाचनाची गोडी कमी व्हायला लागली आहे. उथळ वाचनाकडे अधिक कल अल्याचे दिसते. परिणामी गेल्या दोन दशकापासून सार्वजनिक वाचनालये ओस पडत चालली आहे. या परिस्थितीत वाचन संस्कृती नव्याने प्रस्थापित करणे, नुसतं वाचन नव्हे, तर चांगल्या वाचनाची गोडी लावणे आणि या मातीत वाचक चळवळ घट्ट रुजवणे हा या चळवळीमागचा मुख्य उद्देश असल्याचे 'लेट्स रिड' फाऊंडेशनने सांगीतले. 15 लोकांची टिम हा सर्व पसारा सांभाळते. 

महत्त्वाची बातमी : उद्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणार आहात? आधी ही बातमी वाचा, मग प्लॅन करा

ऑनलाईन माध्यमांचा खुबीने वापर 

लॉकडाऊनमध्ये थांबलेले जग ऑनलाईवर एकवटले होते. नेमक्या या काळात  'लेट्स रिड'ने ट्विटर अकाउंटवर आपली मोहीम सुरु केली.  वाचकांना आकर्षिक करण्यासाठी तूम्ही काय वाचता, आवडते पुस्तक , बुकमार्कचा वापर कसा करता असली हलकीफुलकी प्रश्न ट्विटरवरुन वाचकांना विचारली गेली. वाचकप्रेमींकडून या प्रश्नांना खूप प्रतिसाद मिळाला. या माध्मयातून  लेट्स रिडने या प्लॅटफॉर्मवर अस्सल वाचक, सुप्त वाचकांना एकत्र आणले, त्यांना पुस्तकावर बोलते केले. या काळात वाचनाची सवय खुंटलेले अनेक वाचक वाचनाकडे नव्याने वळले. चांगल्या उत्तरासाठी पुस्तक भेटी देण्याची योजना तुफान लोकप्रिय ठरली. अल्पावधीत लेट्स रिडचे ट्विटर हँडलवर 8 हजाराच्या वर पुस्तकप्रेमी जुळले गेले. ऑनलाईन अभिवाचनाला प्रतिसाद मिळाला.

पुस्तकांची यादी वाचकांकडून

ट्विटर प्लफॉर्मवरुन 'लेट्स रिड'ने वाचकांना विवीध विषयावर बोलते केले. वाचकांकडून त्यांच्या आवडीच्या पुस्तकाची, विवीध पुस्तके, लेखकांची माहिती मागवली. या माध्यमातून 'लेट्स रिड' फाऊंडेशनकडे  लोकांच्या पुस्तकांच्या आवडी निवडीची  एक भली मोठी यादी तयार झाली. या माहितीमुळे फाऊंडेशनला पुस्तक खऱेदी करणे सोपे गेले.

महत्त्वाची बातमी : प्रदूषणास जबाबदार कपन्यांना MPCB च्या नोटिसा, MMR भागातील या 40 कंपन्या पसरावतायत प्रदूषण

अत्याधुनिक मोबाईल लायब्ररी

लायब्ररी मॅनेजमेंसाठी 'लेट्स रिड' टिमने जगभरातील लायब्ररीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. त्यासाठी लेट्स रिड टिमने  युरोप, एशियातील प्रसिध्द वाचनालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या सर्व तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केल्यानंतर, 'लेट्स रिड'ने स्वताचे मोबाईल लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तयार केले.सध्याच्या काळातील हे  प्रगत तत्रंज्ञान असल्याचा दावा लेट् रिडने केला आहे. या ऑनलाईन लायब्ररीतून वाचक पुस्तकाची मागणी नोंदवू शकतात. सदर पुस्तक उपलब्ध आहे का हे त्याला एका क्लिकवर कळते. पुस्तक समिक्षणे, प्रतिक्रीया पोस्ट करु शकता.

दुसऱ्या पुस्तकासाठी अट 

एक पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकाबद्दल परिक्षण नोंदवणे वाचकांसाठी बंधनकारक आहे. पुस्तकाबद्दल न लिहिल्यास त्या वाचकाला दुसरे पुस्तक मिळणार नाही. त्याचे कारणही तेवढेच मनोरंजक आहे. अनेक वाचक पुस्तके आवडीने मागवतात, मात्र वाचत नाही, त्यामुळे असले वाचक शोधून काढण्यासाठी आम्ही ही अट घातल्याचे 'लेट्स रिड' टिमने सांगीतले. चांगल्या प्रतिक्रीया, समिक्षण लिहीणाऱ्या वाचकाला पुस्तके भेट दिली जाते.

विनामूल्य पुस्तके

पहिल्या टप्प्यात 'लेट्स रिड' फाऊंडेशनने जवळपास 10 हजार पुस्तकांची जुळवाजुळव केली. सप्टेंबर महिन्यापासून वेबसाईटवर नोंदणी केलेल्या वाचकांना मोबाईल व्ह्रॅनच्या माध्यमातून घरपोच पोहोचवली जाते. पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यापर्यंत ही मोबाईल व्हॅन कार्यरत आहे. या पुस्तकांसाठी वाचकाकडून  कुठलेही शुल्क आकारले जात नाही. या मोहीमेसाठी फाउंडेशन कुणाकडूनही अनुदान किंवा वर्गणी घेत नाही. पुस्तकेही स्विकारली जात नाही. लेट्स इंडीयाची मुख्य कंपनी संपुर्ण मोहीमेचा खर्च उचलते.

चांगले, वाईट अनूभव

लेट्स रिड टिम सुरुवातीला अनेक प्रकाशक, सार्वजनिक वाचनालयाकडे ही संकल्पना मांडली. मात्र त्यांच्याकडून थंड प्रतिसाद मिळाला. चांगली उत्तरे देणाऱ्या वाचकांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रमामुळे अनेकांनी पुस्तकांसाठी मागणी नोंदवली. मात्र प्रत्येकाला पुस्तके पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे ज्यांना पुस्तके मिळाली नाही, त्यांनी आम्हाला ट्विटरवर ट्रोल केले. आमच्यावर अनुदान लाटण्याचा, प्रकाशकांकडून  टक्केवारी खाण्याचा आरोपही लावला असं  लेट्स रिड टिमने सांगीतले.काहीजणांनी कार्यालयात येऊन धिंगाणा घातला. मात्र यासोबत अनेक चांगली माणसे, अधिकारी या मोहीमेसोबत जुळले.  पुस्तकं डोनेशनसाठी अनेकजण पुढे आले.

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

सध्या काय काम सुरु आहे

ऑनलाईन मागणी नोंदवल्यास घरपोच पुस्तक पाठवल्या जाते. मोबाईल व्हॅन रायगड जिल्हात कार्यरत आहे. नव्या वर्षात दोन मोबाईल लायब्ररी वाचकांसाठी सज्ज होणार आहेत. त्या मराठवाडा, खानदेश भागात वाचकांच्या सेवेत रुजू होणार. भविष्यात दहा मोबाईल व्हॅन सुरु करण्याचा विचार फाऊंडेशनचा आहे. त्याशिवाय भविष्यात मोठ्या गावात अत्याधुनिक वाचनालये उभारण्याचा मानस 'लेट्स रिड'चा आहे. 

वाचक चळवळ ते लोकचळवळ 

कुठल्याही चळवळीशी जोपर्यंत लोक, समाज जुळत नाही तोपर्यंत ती चळवळ यशस्वी होत नाही. त्यामुळे नव्या वर्षात हा उपक्रम लोक चळवळीत रुपांतरीत व्हावा हा संकल्प 'लेट्स रिड' फाउंडेशनचे आहे. वाचकांना ही मोहीम आपली वाटावी, त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी  दात्यांकडून पुस्तके स्विकारण्याचा विचार सुरु आहे. या वर्षात जास्तीत जास्त वाचक जोडण्यासाठी 'लेट्स रिड' फाउंडेशन सज्ज आहे.

'लेट्स रिड'च्या चळवळीत असे व्हा सहभागी

आपणास पुस्तक वाचण्याची आवड असेल आणि या चळवळी सहभागी व्यायचे असेल, त्यासाठी आपल्याला लेट्स रिडच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर जाऊन आपण आपली नोंदणी करू शकता. यानंतर आपण ही या चळवळीचा भाग बनू शकता. 

Lets Read energetic reading movement in the last year full of disappointment


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets Read energetic reading movement in the last year full of disappointment