
प्रति,
मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर
आता थोड्यावेळापूर्वीच तुमची पत्रकार परिषद ऐकली. सध्या मुंबईत कोरोनाच्या आजाराने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबईत कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या रोजच्या रोज वाढतेय. हा आकडा सध्या पाच हजारांच्या घरात आहे, त्यामुळे मुंबईच्या महापौर या नात्याने शहराची काळजी वाटणं आणि लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, यासाठी आग्रही असणं स्वाभाविक आहे. महापौर पदावर असतानाही, तुम्ही स्वत: रस्त्यावर उतरुन, हात जोडून लोकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहातं. मुंबईच्या महापौर या नात्याने तुमची भूमिका एकदम योग्य आहे. पण त्याचवेळी तुम्ही सतत तुमच्या पत्रकार परिषदांमधुन लॉकडाउनचे इशारे देत असता. आज तर तुम्ही लोक सांगून ऐकत नाहीत, त्यामुळे लवकरच मंदिर, लोकल ट्रेन पूर्णपणे बंद होतील, असं म्हणालात.
तुमच्या तोंडून ते शब्द ऐकल्यानंतर एक मुंबईकर म्हणून माझ्या काळाजात धस्स झालं. कारण तुम्हा राजकीय नेत्यांसाठी लॉकडाउन म्हणजे फक्त एक पॉझच बटण आहे. पण सर्वसामान्यांसाठी लॉकडाउन म्हणजे आयुष्यभराचा पॉझ आहे. उद्या कोरोना निघून जाईल, त्यावेळी तुम्ही पुन्हा तुमच्या राजकीय आयुष्यात व्यस्त होऊन जालं. पण तुम्ही घेतलेल्या त्या लॉकडाउनच्या एका निर्णयामुळे आयुष्यातून किती लोक उठलेले असतील याची तुम्हाला कल्पनाही नसेल. मागच्यावर्षी नरेंद्र मोदींनी २४ मार्चच्या रात्री आठ वाजता टीव्हीवर येऊन, लॉकडाउनची घोषणा केली. कोरोनाची साखळी तोडण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यावेळी रुग्ण संख्या कमी असल्यामुळे आपण २१ दिवसात कोरोनावर विजय मिळवू आणि आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत होईल, असंच अनेकांना वाटलं होतं. पण २१ दिवसानंतर पुन्हा २१ दिवस असं ते चक्र सुरु झालं. त्यात सर्वसामान्यांच्या आयुष्याची अक्षरक्ष: वाताहात झाली. अजूनही त्या धक्क्यातून लोक सावरलेले नसताना, तुम्ही दुसऱ्या लॉकडाउनच्या दिशेने निघाला आहात.
एक सर्वसामान्य मुंबईकरांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आज मी हा पत्र प्रपंच केलाय. खरंतर एकावर्षात माझ्या आयुष्यात काय स्थित्यंतर झालय, त्याची तुमच्या सारख्या राजकीय नेत्यांना कल्पनाही नसेल. माझ्या सारखे असे लाखो आहेत, मी फक्त त्यांच एक प्रतिनिधी या नात्याने हे लिहितोय. पहिल्या लॉकडाउनने काही साध्य झालं नाही, ते दुसऱ्या लॉकडाउनने काय साध्य होणार? मुळात जो विषाणू गुणाकाराने वाढत जाणार, त्याला तुम्ही कसे रोखू शकता. देशात केरळने सर्वात आधी या विषाणूवर नियंत्रण मिळवलं होतं. पण त्याच केरळमध्ये मागच्या महिन्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग किती होता? याची माहिती घ्या.
रुग्ण वाढतील, आरोग्य यंत्रणा कोलमडून पडेल, म्हणून लॉकडाउन तुम्हाला उपाय दिसतो. पण हे औषध लागू पडत नाही, हे सिद्ध झालय, उलट त्यामुळे सगळ्यांचच दुप्पट नुकसान होतं. इतका लॉकडाउन प्रभावी असता, तर मग आता दुसऱ्यांदा लॉकडाउनची वेळ तुमच्यावर का आली? मागच्यावर्षी लॉकडाउन केलं, त्यावेळी कोरोनाला रोखणारी लस तुमच्याकडे नव्हती, मग आता ती लस असतानाही लॉकडाउन करण्याची वेळ का आली? याचा जरा विचार करा. लोक मास्क घालत नाही म्हणून त्यांना ५०० रुपये दंड लावता, पण लस उपलब्ध असूनही जे घेत नाहीयत, त्यांचं काय? लस घेण्याची सक्ती कोणावर करता येणार नाही. पण लॉकडाउनच्या धमक्या देण्याऐवजी जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, त्यासाठी तुम्ही राजकीय नेते बोलला असता, तर खूप बर झालं असतं, असो निदान यापुढे तरी लॉकडाउन बद्दल बोलणं टाळा, त्यापलीकडे विचार करा, शेवटी कोरोना विरुद्ध लढण्याशिवाय तुमच्या-आमच्याकडे काही पर्याय नाहीय.
- सर्वसामान्य मुंबईकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.