पालिकेतील लिफ्ट पाच दिवसांपासून बंद, अपंग कर्मचाऱ्यांचे हाल

दिनेश गोगी
मंगळवार, 10 जुलै 2018

उल्हासनगर : लिफ्टच्या तळात पावसाचे जमिनीत झिरपणारे पाणी शिरल्याने उल्हासनगर पालिकेची लिफ्ट गेल्या पाच दिवसांपासून बंद पडलेली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या मजल्यातील कार्यालयात कामाला असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना पायऱ्यांवरून चढ-उतार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

उल्हासनगर : लिफ्टच्या तळात पावसाचे जमिनीत झिरपणारे पाणी शिरल्याने उल्हासनगर पालिकेची लिफ्ट गेल्या पाच दिवसांपासून बंद पडलेली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या मजल्यातील कार्यालयात कामाला असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना पायऱ्यांवरून चढ-उतार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून त्याचे जमिनीत गेलेले आणि झिरपणारे पाणी लिफ्टच्या तळात शिरलेले आहे. लिफ्ट सुरू केलीच तर शॉक लागण्याची भीती असल्याने ही लिफ्ट बंद करण्यात आली आहे. तळातील या पाण्याला बाहेर काढण्याची गरज आहे. मात्र पालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाला याच्या तक्रारी गेल्यावरही त्याकडे लक्ष देण्यात येत नसल्याने गेल्या पाच दिवसांपासून ही लिफ्ट बंद ठेवण्यात आलेली आहे. फिफ्ट बंद असल्याचा कागद लिफ्टवर चिकटवण्यात आलेला आहे.

उल्हासनगर पालिकेत सुमारे 30-40 च्या आसपास पायाने अपंग असलेले कर्मचारी आहेत. याशिवाय पायाला गँगरीन झालेले, शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी देखील आहेत. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी अच्युत सासे यांनी दिली.

विशेष म्हणजे पालिकेतील ही लिफ्ट अपंगांच्या निधीतून उभारण्यात आलेली आहे. त्याचा वापर कर्मचारी आणि समस्या घेऊन येणारे अपंग यांच्या सोबत इतर कर्मचारी नागरिक देखील करतात. मात्र, पाच दिवसांपासून ही लिफ्ट बंद असल्याने दुसरा मजला सर करण्यासाठी अपंग कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यांना आधार घेत चढ-उतार करण्याची वेळ आलेली असून अजून किती दिवस हा त्रास सहन करावा? कुणी वाली आहे की नाही? अशा सवालाची आर्त हाक ते मनातून अधिकाऱ्यांना देत आहेत.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता महेश सितलानी यांच्याशी संपर्क साधला असता, येत्या एकदोन दिवसात लिफ्टच्या तळात साचलेले पाणी बाहेर काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lift of Municipal block for five days