हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी गोड बातमी; स्थानकांवर लवकरच मिळणार ही सुविधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मध्य व पश्‍चिम रेल्वेपाठोपाठ आता हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांवरही लवकरच सरकते जिने व उद्‌वाहक (लिफ्ट) बसवण्यात येणार आहेत.

नवी मुंबई : मध्य व पश्‍चिम रेल्वेपाठोपाठ आता हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांवरही लवकरच सरकते जिने व उद्‌वाहक (लिफ्ट) बसवण्यात येणार आहेत. सिडको व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला ठाण्याचे खासदार राजन विचारे उपस्थित होते. हार्बर मार्गावर नवी मुंबईत येत असलेल्या रेल्वेस्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट बसवण्याबाबत सिडकोतर्फे अंदाजपत्रक तयार करून रेल्वेकडे दिले जाणार आहे. प्रकल्पावर येणाऱ्या खर्चाबाबत दोन्ही प्राधिकरणांमध्ये निश्‍चितता झाल्यावर कामाला सुरुवात केली जाणार आहे. 

नवी मुंबईतील हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेस्थानकांबाबत असलेले प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी सिडकोच्या दालनात रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांच्या पालकत्वाबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. स्थानकांच्या देखभाल-दुरुस्तीवरून रेल्वे व सिडको प्रशासनात एकमत होत नसल्यामुळे रेल्वेस्थानकांमधील फलाटांवर प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा विचारे यांनी उपस्थित केला. स्थानकांच्या देखभाल दुरुस्तीवर सिडको 67 टक्के; तर रेल्वे 33 टक्के अशी खर्चात भागीदारी ठरवण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे सिडकोकडे खर्चाची रक्कम अदा करीत आहे. परंतु फलाटांवर बसवण्यात येणाऱ्या जिने आणि उद्‌वाहकांचा खर्च रेल्वेने सिडकोकडे भरावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोकडून हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वेस्थानकांमध्ये टप्प्या-टप्प्याने सरकते जिने व उद्‌वाहक बसवण्यात येणार आहेत. 
ही बातमी वाचा ः तिला वाचवता वाचवता तोच जळाला
पहिल्या टप्प्यात या स्थानकांवर जिने 
पहिल्या टप्प्यात सीवूड्‌स-दारावे व नेरूळ या रेल्वेस्थानकांवर सरकते जिने बसवण्याबाबत सिडकोच्या विचाराधीन आहे. रेल्वेस्थानकांवर सरकते जिने व उद्‌वाहक बसवण्याबाबतच्या खर्चाचे अंदाजपत्रक सिडकोतर्फे तयार केल्यानंतर रेल्वेकडे पाठवण्यात येणार आहे. रेल्वेचा हिरवा कंदील आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सिडकोच्या रेल्वे प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चौटालिया यांनी सांगितले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lifters will also be installed at Railway stations in Navi Mumbai on Harbor line