'सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीचे थेट प्रक्षेपण, आयपीएल प्रमाणेच हक्कांचा लिलाव करा'; सचिन सावंत यांचा भाजपला टोला

कृष्ण जोशी
Sunday, 27 September 2020

आयपीएल प्रमाणे सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशींच्या थेट प्रसारणाचे हक्कांचाही लिलाव करावा, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्त सचिन सावंत यांनी लगावला आहे. 

मुंबई - बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील एनसीबी चौकशीची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिनिटा-मिनिटाला बाहेर येत असून हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. अशाच पद्धतीने चौकशी करायची असेल तर आयपीएल प्रमाणे सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशींच्या थेट प्रसारणाचे हक्कांचाही लिलाव करावा, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्त सचिन सावंत यांनी लगावला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच म्हटल्याप्रमाणे आपदा मे अवसर (संकटात संधी) या तत्वाचेही यामुळे पालन होईल. तसेच सरकारच्या तिजोरीतही पैसे जमा होतील, असेही सावंत यांनी म्हटले आहे. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बॉलिवूडमधील अभिनेत्यांची सध्या एनसीबी मार्फत चौकशी केली जात आहे. त्यात प्रत्येक अभिनेत्याला काय प्रश्न विचारले, त्यांची काय उत्तरे दिली, कोण किती हसले व कसे रडले, त्यावर तपास अधिकारी काय म्हणाले, याची मिनिटा मिनिटाची माहिती बाहेर येत आहे. प्रसारमाध्यमांद्वारे ती माहिती क्रिकेट कॉमेंट्रीसारखी ऐकवली जात आहे. हा गंभीर प्रकार असल्याची टीकाही सावंत यांनी केली आहे. खरे पाहता ही पद्धत योग्य नाही, कारण अशा प्रकारामुळे पुढच्या संशयितालाही कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचा अंदाज येतो व तो आधीच तयारीत राहू शकतो, असेही सावंत यांनी दाखवून दिले. 

चौकशी अशीच करायची असेल तर या प्रक्षेपण हक्कांचा लिलाव करावा, नरेंद्र मोदी सरकारची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे या चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचा लिलाव केला तर पंतप्रधान केअर फंडात जमा झाली तेवढी नाही तरी काहीतरी रक्कम नक्कीच जमा होईलच. या सर्व प्रकरणांचा उपयोग भाजपाला बिहारच्या निवडणुकीत प्रचार करण्यासही उपयोगी पडेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होईल त्यामुळे भाजपाचे आर्थिक व राजकीय दोन्ही हेतू साध्य होतील, असे सावंत म्हणाले.

'पंचवीस वर्षांची शिवसेनेची मजबुरी काय? हे राऊत यांनी उघड करावे'; भाजप नेत्याचा सवाल

सरकारचे अपयश लपवणे आणि मुख्य समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे यासाठी अशा भलत्याच मुद्द्यांचा गाजावाजा केल्यास भाजपाला फायदा होतो. त्यासाठी अशा प्रक्षेपणाचा फायदा होईल. हे सर्व फायदे पाहता सरकारने याचा गांभिर्याने विचार करावा असा उपरोधीक सल्लाही सावंत यांनी दिला आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live broadcast of CBI ED NCB inquiries auction rights like IPL Sachin Sawants criticizes BJP