रुळाला तडा गेल्याने ट्रान्स हार्बरवरील लोकल सेवा विस्कळीत!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि ऐरोली रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने, सोमवारी (ता.16) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास लोकल सेवा दोन तास ठप्प होती. त्यामुळे ऐन सायंकाळच्या वेळी चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि ऐरोली रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने, सोमवारी (ता.16) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास लोकल सेवा दोन तास ठप्प होती. त्यामुळे ऐन सायंकाळच्या वेळी चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हजारो चाकरमानी विविध रेल्वेस्थानकांमध्ये अडकून पडले होते. सायंकाळी 6 वाजता रेल्वे रुळाची दुरुस्ती झाल्यानंतर या मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी हताश झाले होते. 

ही बातमी वाचली का? मुंबईच्या ...'या' भागात सुरू झालीये रो-रो सेवा

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि ऐरोली रेल्वेस्थानकाच्या दरम्यान मुकंद कंपनीजवळ तीव्र वळण असून, येथील रेल्वे रुळाला सोमवारी (ता.16) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक तडा गेला. हा प्रकार ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या मोटरमनच्या निदर्शनास आला. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन लोकल थांबवत, त्यांनी घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे ट्रान्स हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या प्रकारामुळे लोकल गाड्यांच्या एकापाठोपाठ रांगा लागल्या. तसेच सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या वेळी रेल्वेच्या दुरुस्ती पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. दोन तासात रेल्वे रुळांची दुरुस्ती झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

ही बातमी वाचली का? कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

प्रवाशांची पायपीट 
ट्रान्स हार्बरवरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी या मार्गावरील स्थानकांमध्ये अडकून पडले होते. ठाणे ते वाशीदरम्यानच्या सर्वच स्थानकांमध्ये या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रवाशांना मोठी पायपीट करावी लागली. सायंकाळी घरी जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आलेल्या हजारो प्रवाशांनी इतर वाहनांची मदत घेऊन, आपले घर गाठले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local service on Trans Harbor line jammed due to track break