esakal | लोकल प्रवास धोक्‍याचा; लुटमारी विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवासी भयभीत 
sakal

बोलून बातमी शोधा

लोकल प्रवास धोक्‍याचा; लुटमारी विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवासी भयभीत 

सीवूड्‌स - सीबीडी रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये एका तरुणाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत मानखुर्दजवळ लोकलमध्ये एका नोकरदार महिलेचा विनयभंग करण्यात आला.

लोकल प्रवास धोक्‍याचा; लुटमारी विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवासी भयभीत 

sakal_logo
By
सुजित गायकवाड

नवी मुंबई -: सीवूड्‌स - सीबीडी रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये एका तरुणाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत मानखुर्दजवळ लोकलमध्ये एका नोकरदार महिलेचा विनयभंग करण्यात आला. या घटनांनंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या; परंतु हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर अशा गुन्ह्यांच्या घटना थांबल्या नसल्याने महिलांबरोबरच पुरुष रेल्वे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. 

कोरोनामुळे सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मर्यादित संख्येत लोकल धावत आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या कमी असते. रात्री दहा वाजल्यानंतर तर अनेक स्थानकांत शुकशुकाट असतो. त्यातच सुरक्षेसाठी पोलिस बलही अपुरे असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे फावले असून धावत्या लोकलमध्ये लुटमार आणि विनयभंग करण्याचे धारिष्ट्य ते करू लागले आहेत. 
रेल्वे पोलिसांनी अशा घटनांचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासचक्र फिरवत आरोपींना अटक केली आहे. तसेच गस्तही वाढवली आहे; परंतु अशा घटना थांबल्या नसल्याने प्रवासी भयभीत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

मुंबई - नवी मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

टवाळखोरांचा त्रास वाढला 
पनवेल, नवी मुंबईतून सीएसएमटी आणि ठाणे मार्गावरील धावणाऱ्या लोकल संख्या संध्याकाळनंतर कमी झाल्यानंतर हार्बर मार्गावरील पनवेल, खांदेश्‍वर, मानसरोवर, खारघर, सीबीडी-बेलापूर, सीवूड्‌स, नेरूळ, सानपाडा, जुईनगर, वाशी या रेल्वेस्थानकांत शुकशुकाट असतो. फलाटावर एकटी महिला पाहून टवाळखोरांचे गट त्रास देतात. ट्रान्सहार्बर मार्गावरही लोकलची संख्या कमी असल्याने या मार्गावरील कोपरखैरणे, ऐरोली आणि तुर्भे ही रेल्वेस्थानके लुटमारी करणाऱ्या टोळ्यांचे अड्डे झाले आहेत. 

घटनाक्रम 
- 21 डिसेंबरला सीवूड्‌स-दारावे ते बेलापूर-सीबीडी रेल्वे स्थानकादरम्यान एका युवकाला धावत्या लोकलमध्ये लुटले 
- 22 डिसेंबरला वाशी खाडीपुलावर एका तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलल्याचे वृत्त होते. तिने आता तोल जाऊन पडल्याचे स्पष्ट केले आहे. 
- 25 डिसेंबरला सुमारास मानखुर्द रेल्वेस्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग 
- 27 डिसेंबरला जुईनगर रेल्वेस्थानकात दोन आरोपींची एका व्यक्तीला मारहाण 

हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या आठवड्यात घडलेल्या सर्व गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलांच्या डब्यात पहाटे सहा ते रात्री नऊ या वेळेत पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक डब्यात पोलिस हवालदार तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या होमगार्डची संख्या कमी आहे. जानेवारी महिन्यात होमगार्ड उपलब्ध होणार आहेत. 
- अनिल पाटील,
सहायक पोलिस आयुक्त, रेल्वे 

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या अगोदरही फलाट आणि लोकलमध्ये पोलिस तैनात करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे; मात्र रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यास "रेल रोको' करण्यात येणार आहे. 
- दिनेश पारेख,
अध्यक्ष, नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटना 

लोकलच्या डब्यात महिला पोलिस असल्यास भीती वाटत नाही; मात्र काही दिवसांपासून सानपाडा, तुर्भे आणि ऐरोली या रेल्वेस्थानकांदरम्यान काही टवाळखोर लोकलमध्ये घुसतात. त्यामुळे महिला प्रवाशांना त्रास होतो. सकाळी तर डब्यात पोलिस नसतात. सानपाडा रेल्वेस्थानकातही रात्री पोलिस तैनात नसतात. त्यामुळे भीती वाटते. 
- शर्मिला जाधव,
महिला प्रवासी 

Local travel is dangerous Passengers frightened by incidents of looting and molestation

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top