महामुंबईतील 'या' क्षेत्रांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

या भागात रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी 26 दिवसावर गेला आहे. या कालावधीत भाजीविक्री, फळविक्री, फेरीवाले, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलीत.

 

मुंबई ः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. राज्यभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच आता यात नवी मुंबईही पुढे आहे. येथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने एका आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सोमवारपासून 5 जुलैपर्यंत दहा विशेष कंटेंन्मेंट झोनमध्ये संपूर्ण लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सुविधांमधील मेडिकल आणि दुधाची दुकानं वगळता इतर सर्व प्रकारची दुकानं बंद राहतील.

पुनःश्च हरिओम.. मुंबईकरांनो, दोन किलोमीटरपुढे जाऊ नका; वाचा कोणी केलंय आवाहन

भाजीपाला दुकाने आणि किराणा मालाची दुकानं बंदच ठेवण्यात येणार आहे. लोकांच्या हालचालींवर कठोर निर्बंध लावण्यात आलेत. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे NMMCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 10 झोन व्यतिरिक्त, आणखी दोन विशेष कंटेंन्मेंट झोनमध्ये 30 जून ते 6 जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन असेल. 

एनएमएमसीचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या विशेष कंटेंन्मेंट झोनची यादी जाहीर केली. या यादीत ही दिवाळे, बेलापूरमधील करावे गाव, तुर्भे स्टोअर्स, तुर्भे सेक्टर 21 आणि 22, जुहू गाव, सेक्टर 11 वाशी, खैराणे गाव (सेक्टर 12) आणि कोपरखैरणेमधील बनकोडे गाव, कोपरखैरणे येथील सेक्टर 19, ऐरोलीतील चिंचपाडा आणि रबाळे गाव आहे. सीबीडी बेलापूर (सेक्टर 1 ते 9) आणि वाशी गाव (सेक्टर 30) जून 30 पासून जुलै 6 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असेल. 

प्लाझ्मा थेरेपी ठरतेय गुणकारी; नायर रुग्णालयातून तब्बल 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त...

एनएमएमसीने यापूर्वी विशेष कंटेंन्मेंट झोनमधील लोकांसाठी जागरूकता मोहीम राबविली आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे. तसेच 28 जूनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा 5 जुलैपर्यंत पुरेल इतका साठा घरातच करुन ठेवावा आणि पालिकेला कोरोनाची साखळी मोडण्यात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलं. 

या सहा दिवसांच्या कालावधीत आम्ही आमच्या वैद्यकीय पथकांना सामाजिक कार्यकर्त्यांसह या कंटेंन्मेंट झोनमध्ये पाठवू. आम्ही डोअर-टू-डोअर स्क्रीनिंग करणार असून त्यापैकी संशयित रुग्णांची स्वतंत्रपणे यादी केली जाईल. लोकांनी घाबरू नये असं नागरिकांना पालिकेनं आवाहन केलं आहे. नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे कारण आमचा प्रयत्न नवी मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमणाची साखळी तोडण्याचा आहे, असं मिसाळ म्हणालेत. 10 कंटेंन्मेंट झोनमध्ये पूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा देण्याचे आवाहन पालिकेनं धर्मादाय संस्था आणि समाजसेवकांनाही केलं आहे.

नवी मुंबईत कोरोना व्हायरसमुळे 205 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 6,200 वर पोहोचला आहे. 2,465 सक्रिय पॉझिटिव्ह प्रकरणे आहेत, ज्यात रविवारी त्यात 197 जणांची भर पडली आहे. 1,129 लोकांच्या चाचणीचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. 44,241 लोकांनी आपलं क्वांरटाईन पूर्ण केलं असून 13,161 लोकं अद्याप होम क्वांरटाईन आहेत. 

संतप्त मूर्तिकार आंदोलनाच्या पवित्र्यात, मंडप परवानगीसाठी सरकारकडून अजूनही निर्देश नाही..

भांडुपमध्ये 5 जुलैपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन

पूर्व उपनगरातील भांडुपमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 5 जुलैपर्यंत वाढविण्यात आलाय. सध्या रुग्णसंख्येत भांडुप मुंबईत चौथ्या क्रमांकावर असून, या भागात दररोज 100 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, मालाड, अंधेरी आणि पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुपमध्ये रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येताहेत. भांडुपमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज 100च्या वर रुग्णांची नोंद होताना दिसतेय.

संपूर्ण मुंबईतील रुग्णवाढीचा दर 1.71 टक्के असताना एकटय़ा भांडुपमध्ये रुग्णवाढीचा दर 3 टक्के आहे. 24 जूनला येथे 103, 25 जूनला 121, 26 जूनला 118 रुग्णांची नोंद झाली. भांडुपमधील रुग्णसंख्या ही १९ जूनला 3,399 होती ती 28 जूनला 4,119 वर जाऊन पोहोचली. या भागात रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी 26 दिवसावर गेला आहे. या कालावधीत भाजीविक्री, फळविक्री, फेरीवाले, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown again in these areas in the MMRDA area; Precautions to prevent infection