esakal | LockdownEffect: भाड्याच्या जागांचे मार्केट रोडावले; 25 ते 30 टक्क्यांनी किंमती कमी; तरीही प्रतिसाद नाही
sakal

बोलून बातमी शोधा

LockdownEffect: भाड्याच्या जागांचे मार्केट रोडावले; 25 ते 30 टक्क्यांनी किंमती कमी; तरीही प्रतिसाद नाही

एरवी प्रचंड तेजीत असणारे मुंबईतील भाड्याच्या जागांचे मार्केट कोरोनाच्या टाळेबंदीमुळे चांगलेच रोडावले आहे.

LockdownEffect: भाड्याच्या जागांचे मार्केट रोडावले; 25 ते 30 टक्क्यांनी किंमती कमी; तरीही प्रतिसाद नाही

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : एरवी प्रचंड तेजीत असणारे मुंबईतील भाड्याच्या जागांचे मार्केट कोरोनाच्या टाळेबंदीमुळे चांगलेच रोडावले आहे. या काळात व्यापारी आणि निवासी जागांचे भाडे 25 ते 30 टक्क्यांनी कमी झाले आहे. तरीही अनेकांनी भाड्याच्या जागा सोडून दिल्या. शिवाय या जागांचे व्यवहारही या काळात प्रचंड कमी झाले आहेत. 

मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

मुंबईतील रिअल इस्टेटचा बाजार गेल्या वर्षभरापर्यंत तेजीत होता. मात्र, नोटबंदी आणि नंतर जीएसटीमुळे हा डोलारा कोसळण्यास सुरूवात झाली. त्यात कोरोनाच्या टाळेबंदीने निर्णायक तडाखा दिला. उपनगरी गाड्या सुरु झाल्यानंतर निदान कार्यालये सुरु होतील.  त्यांनंतर भाडेव्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा आतापर्यंत होती. मात्र, आता लोकांच्या उत्पन्नावर झालेला परिणाम पूर्ववत होईल तेव्हाच निवासी जागांचे व्यवहार जोर धरतील, अशी चिन्हे आहेत. 
गेल्या सहा महिन्यांमध्ये मुख्यतः व्यापारी जागांच्या भाड्यांना मोठा फटका बसला. सुमारे चाळीस टक्के लोकांनी आपल्या व्यापारी जागा रिकाम्या केल्या. माझ्या ओळखीतील किमान पंचवीस लोकांच्या जागा गेली चार महिने तशाच पडून आहेत. कारण भाडी कमी करूनही सध्या भाडे कोणालाच परवडतच नाही, अशी स्थिती असल्याचे वीणा प्रॉपर्टी कन्सलटंट समूहाचे करण नाईक यांनी 'सकाळ'ला सांगितले. शिवाय ऑफिसात बसून काम करण्यापेक्षा घरूनच ऑनलाईन व्यवहार करणे सर्वांनाच सोयीचे पडते. अशा स्थितीत प्रचंड भाडे भरण्यापेक्षा कित्येक लोकांनी रीतसर नोटीस देऊन भाडेकरार रद्द केले, असेही त्यांनी सांगितले. 

वरळी येथील इमारतीच्या लिफ्टमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

मुंबईत निवासी जागांचे दरही काही भाग वगळता जवळपास पंचवीस टक्के कमी झाले आहेत. दरवर्षीची वाढ दूरच अनेकांनी आहे तेच भाडे पुढील तीन वर्षे कायम ठेवण्याचे करार केले आहेत. परळ विभागात पाचशे चौरस फुटांच्या वन बीएचकेचे भाडे एरवी चाळीस हजार असायचे, ते आता 32 हजारांपर्यंत घसरले आहे. 
मुंबईत भाड्याने जागा घेण्याचे व्यवहारही वीस टक्क्यांनी कमी झाले आहेत. सध्या इमारतींमध्ये नव्या भाडेकरूंना प्रवेश नाही. मालकही गावी गेले आहेत. त्यामुळे व्यवहार कमी झाले आहेत. दरवर्षी मार्च ते जून दरम्यान लोक जागा सोडून नव्या जागा शोधतात. आता सरकारने शैक्षणिक वर्षच जानेवारीपासून सुरु केल्यास नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लोक नव्या जागा शोधतील, अशी शक्यताही करण नाईक यांनी व्यक्त केली. 

मंदिर उघडण्यासाठी मनसेचे आंदोलन; विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून केली महाआरती

'को वर्किंग स्पेस'ही थंड
भाड्याने जागा घेऊन तिथे सर्व सोयी करून ती जागा कार्यालय म्हणून पुन्हा भाड्याने देणाऱ्या 'को वर्किंग स्पेस'चा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. एकतर वर्क फ्रॉम होममुळे सर्वांचा जम बसला आहे. कर्मचाऱ्यांना मालक बोलावत असले तरी रेल्वे नसल्याने त्यांनाही येता येत नाही. त्यामुळे एरवी अशा जागा आनंदाने घेणाऱ्या कंपन्या आता भाड्यात पन्नास टक्के सवलत मागत आहेत, असे वर्कलॉफ्टचे असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर प्रशांत डावरे यांनी सांगितले. 

वाढत्या संसर्गामुळे पॅरोल अर्जावर तातडीने निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे कारागृह प्रशासनांना निर्देश

प्रथमच भाडेकरूंना अनुकूल
सध्या भाड्याच्या दरात घसरण सुरु झाल्याने मुंबई शहर हे प्रथमच भाडेकरूंना अनुकूल झाले आहे. भाड्याच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. तर कमी भाड्यासाठी लोक उत्तर दिशेच्या उपनगरांकडे जात आहेत, असे नेस्टवे टेक्नॉलॉजी या जागा भाड्याने देणाऱ्या कंपनीचे वरिष्ठ संचालक सतीश सोनवले यांनी सांगितले. लोक कमी भाड्याच्या लहान जागा शोधत आहेत. तसेच एरवी मध्यस्थ दलालांना मधे न घेणारे मालक आता मागणी कमी झाल्याने दलालांकडे विचारणा करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image