esakal | यंत्रांनंतर होणार व्हीव्हीपॅटची मोजणी
sakal

बोलून बातमी शोधा

VVPat-Machine

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मतदान यंत्रांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच "व्हीव्हीपॅट'ची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया कशी असावी, याच्या सूचना पाठवल्या आहेत, त्यानुसार व्हीव्हीपॅटच्या मोजणीची वेळ सर्वांत शेवटी असेल.

यंत्रांनंतर होणार व्हीव्हीपॅटची मोजणी

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मतदान यंत्रांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच "व्हीव्हीपॅट'ची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया कशी असावी, याच्या सूचना पाठवल्या आहेत, त्यानुसार व्हीव्हीपॅटच्या मोजणीची वेळ सर्वांत शेवटी असेल.

निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघात "व्हीव्हीपॅट'च्या मोजणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे. या कक्षाला वेगळे नाव असेल. यंत्रांची मतमोजणी पूर्ण झाल्यावर प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघनिहाय एकेका यंत्राला बाहेर काढण्यात येईल. मतपत्रिका कुठेही जाऊ नयेत, त्या ओढल्या जाऊ नयेत यासाठी सभोवताल जाळी असलेला एक पिंजरासदृश कक्ष बांधला जाणार आहे. बॅंकेत एखाद्या कॅशियरला ज्याप्रमाणे एका कोपऱ्यातून पैसे काढण्याची स्लीप दिली जाते त्याचप्रमाणे "व्हीव्हीपॅट'च्या या छोट्या स्लीप आतमध्ये पाठवल्या जातील. तेथे उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतमोजणी होईल. "व्हीव्हीपॅट' मोजणीच्याही सात फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच निकाल घोषित केला जाणार आहे.

व्हीव्हीपॅटसाठी चिठ्ठ्या
लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील नेमक्‍या कोणत्या बूथवरील मतपत्रिकांची मोजणी करायची, हे ठरवण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. चिठ्ठीत ज्या मतदारसंघाचे नाव येईल तेथील मतपेटी उघडली जाईल. सूत्रांनी व्यक्‍त केलेल्या अंदाजानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत मतयंत्रांची मोजणी पूर्ण होईल. मुंबईतील एका निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार निकाल घोषित होण्यास या प्रक्रियेमुळे किमान रात्रीचे नऊ वाजतील.

loading image
go to top