Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

लोकसभेच्या निवडणुकीचा पाचवा आणि राज्यातील अखेरचा टप्पा २० मे रोजी पार पडत आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024esakal

मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीचा पाचवा आणि राज्यातील अखेरचा टप्पा २० मे रोजी पार पडत आहे. ठाणे, पालघर, कल्याणसह महामुंबईतील तब्बल १० मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीत प्रमुख लढती होणार आहेत.

यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून या टप्प्यात मुंबई हाच प्रचाराचा केंद्रबिंदू असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्या प्रचारतोफा धडाडणार असून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे.

पाचव्या टप्प्यात राज्यात एकूण १३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांची नजर मुंबईवर स्थिरावली आहे. मुंबईतील सहा जागांपैकी तीन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे.

तर तीनपैकी दोन जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप तर एका जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. मुंबईत प्रचार हळूहळू जोर पकडत आहे. या आठवड्यात रोड शो, मोठ्या रॅली, छोट्या प्रचारसभा आणि पदयात्रा यामुळे प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

राहुल, प्रियांका गांधींची प्रचारसभा नाही

मुंबईमध्ये काँग्रेस दोन जागा लढवत असून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यस्तरीय नेते प्रचारात सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची मात्र मुंबईत प्रचारसभा किंवा रोड शो होणार नाही.

राहुल गांधी लढवत असलेल्या रायबरेली मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे. अमेठीची जागाही काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे दोघेही जण उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसणार आहेत. मात्र, खर्गे यांच्यासह रमेश चेन्निथला, सलमान खुर्शीद, जयराम रमेश यांच्यासारखे बडे नेते ही कसर भरून काढणार आहेत.

भाजप सर्व शक्तिनिशी मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुधवारी (ता. १५) घाटकोपर येथे रोड-शो आयोजित करण्यात आला आहे. रात्री आठ वाजल्यापासून रोड शोला सुरुवात होणार आहे. महायुतीच्या समारोपाची सभाही नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित शिवाजी पार्कवर होणार आहे. मुंबईतील प्रचारासाठी पाच राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री मुंबईत डेरेदाखल झाले असून ते प्रचार, बैठका घेत आहेत.

राज्यभर प्रचारसभा घेत फिरलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी आता मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. ते मुंबईत छोट्या-छोट्या प्रचार सभा घेत आहेत. याशिवाय तेजस्वी सूर्या, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह बडे नेते पत्रकार परिषदा घेत आहेत. सध्या उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर अधिक लक्ष दिले आहे. मात्र आवश्यकता असेल तिथे मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा घेण्याचे भाजपचे नियोजन आहे.

रणधुमाळीची तयारी

- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : महाविकास आघाडीची १७ मे रोजी ‘बीकेसी’त होणाऱ्या सांगता सभेची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आहे. मोठी मैदाने कमी असल्याने छोट्या सभांवर सध्या या पक्षाचा भर आहे.

- शिवसेना : मुंबईत शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात आहेत. पाचव्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात प्रचारासाठी एक दिवस देणार आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते मुंबईत दाखल.

- आप : महाविकास आघाडीच्या समारोपाच्या सभेला अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार.

- मनसे : ‘एनडीए’च्या शिवाजी पार्कवरील सभेला राज ठाकरे उपस्थित राहणार.

येथे मतदान होणार

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई

मोदी यांचा आज मुंबईत ‘रोड शो’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील पहिला ‘रोड शो’ उद्या (ता. १५) होणार आहे. घाटकोपर पश्चिमेतील अशोक सिल्क मिल येथून ‘रोड शो’ला प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या ‘रोड शो’त या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा तसेच सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

नाशिकमध्ये प्रचाराचे वादळ

नाशिक व दिंडोरीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती व महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (ता.१५) दुपारी २ वाजता पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभा होणार आहे. त्यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वणी (ता.दिंडोरी) येथील मविप्र महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या सभांमध्ये कांदा व द्राक्ष उत्पादकांचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com