Dombivali News : आम्ही एकत्रच असे म्हणत चव्हाण यांनी पाटलांना घेतले महायुतीत; लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा

आम्ही तिघे एकत्रच असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना महायुतीत जणू सामील करून घेतले.
raju patil, ravindra chavan and shrikant shinde
raju patil, ravindra chavan and shrikant shindesakal

डोंबिवली - आम्ही तिघे एकत्रच असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना महायुतीत जणू सामील करून घेतले. काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. शिंदे व मनसेचे आमदार राजू पाटील एकत्र एका मंचावर आले होते. त्यावेळीच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व मनसेचे मनोमिलन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

त्यातच आज मंत्री चव्हाण यांनी आम्ही तिघे एकत्र असे म्हणत मनसेचा महायुतीला पाठिंबा असल्याचे जाहिरच करून टाकले. याचवेळी त्यांनी लोकसभेपर्यत अशा समर्पक शब्दाचा उच्चार न विसरता केल्याने विधानसभेवेळी वेगळं चित्र पहायला मिळेल असे संकेत जणू दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कल्याण तालुक्यातील भंडार्ली, दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, ठाकूरपाडा, नारिवली, निघू आदी भागातील रस्ते कामांसाठी 14.20 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचे भूमिपूजन रविवारी पार पडले.

या भूमिपूजन सोहळ्यासाठी भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील एकत्र आले होते. याप्रसंगी बोलताना महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर चांगल्या प्रकारे विकास हा होत असतो असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

तसेच मंचावर महायुतीचे असणारे आमचे सर्व सहकारी उपस्थित आहेत असे म्हणत त्यांनी आमदार राजू पाटील येथे उपस्थित आहेत असे सांगत मनसे महायुती मध्ये सहभागी झाली असल्याचे संकेत दिले. चव्हाण म्हणाले, राजू पाटील यांनी या सगळ्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभारी त्यांनी मांनले आहेत. त्यामुळे लोकसभेपर्यंत ते शंभर टक्के महायुती सोबत आहेत.

कारण त्यांच्या मनामनामध्ये श्रीरामाचे झालेला भव्य मंदिर आहे. या वेळेला त्यांनी पाहिल, त्याचा अनुभव ज्यावेळेला घेतला तेव्हा त्यांनी आणि त्यांचे नेते या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ एकच आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये आहे.

त्यांच्या पक्षांचा अजेंडा काय तर विकासाचा अजेंडा असेल, हिंदुत्वाचा अजेंडा असेल. जर या भागात अतिशय चांगल्या पद्धतीने विकास काम होत असेल तर ते नक्कीच आपल्याबरोबर राहणार यात काही शंका नाही याची मला पूर्ण खात्री आहे असे चव्हाण म्हणाले.

इतकेच बोलून चव्हाण थांबले नाहीत, तर आम्ही तिघे एकत्रच आहोत. काही वेळेस वरच्या मंडळींची जी भावना असते त्या भावना स्पष्ट करता येत नसतात. कल्याण लोकसभेमधील असलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आहोत. हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर एकत्रित आहोत. हा मतदारसंघ उजव्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून हॅट्रिक करून निवडून देणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

फक्त लोकसभेपर्यत...आणि एकच हशा पिकला

मंत्री चव्हाण यांनी लोकसभे पर्यंत आमदार राजू पाटील हे आमच्या सोबत असतील असे म्हणताच पाटील यांनी फक्त लोकसभेपर्यतच ना ? असा प्रतिसवाल करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावर पुढे बोलणे टाळत मंत्री चव्हाण यांनी आपले भाषण पुढे सुरू केले.

याच दरम्यान आमदार राजू पाटील यांनी आपल्या भाषणात मंत्री चव्हाण यांच्या सोबत आमचे चांगले संबंध असल्याचे बोलले होते. पाटील म्हणाले, गावात आम्हाला जास्त निधी मिळत नव्हता. ग्रामीण झेडपीचा निधी जास्त नसतो. एमएमआरडीए च्या माध्यमातून काही काम झाली होती. परंतु जसे रवींद्र चव्हाण हे जसे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त आनंद मलाच झाला असेल.

कारण माझ्या हक्काचा माणूस त्या मंत्रीपदावर बसल्यावर. आम्ही इथले काही रस्ते दर्जावरती करून पीडब्ल्यूडी मध्ये ते समाविष्ट करून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. अर्थात आयडिया त्यांनी दिली होती. अशी मागणी करा आम्ही देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी भरपूर निधी दिला. आज त्या कामांचे उद्घाटन होत आहे असे म्हणत आमदार राजू पाटील यांनी चव्हाण व आम्ही आधी पासून एकत्र असल्याचे संकेत दिले होते.

14 गावांचा नुकताच नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार तसा शासनाने जीआर देखील काढला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी गावातील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करत कामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे. लोकसभे नंतर येणरी विधानसभेची निवडणूक व त्यानंतर नवी मुंबई महापालिका निवडणुका पाहता 14 गावांना विशेष महत्व प्राप्त झाले असून सर्व पक्ष आता इथे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com