लोणार सरोवर ही राज्यातील दुसरे रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित

मिलिंद तांबे
Saturday, 14 November 2020

लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसवी साईट म्हणून रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड  या आंतरराष्ट्रीय संस्थेने घोषित केल्याची माहिती, वन मंत्री  संजय राठोड यांनी दिली. 

मुंबई : लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसवी साईट म्हणून रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड  या आंतरराष्ट्रीय संस्थेने घोषित केल्याची माहिती, वन मंत्री  संजय राठोड यांनी दिली.  मागील दहा वर्षापासून या संदर्भात आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठपुरावा चालू होता आणि जुले 2020 मध्ये याबाबत अंतिम कागदपत्रे सादर करण्यात आली होती.  या कागदपत्रांच्या आधारे लोणार सरोवर ही जागतिक रामसर साईट म्हणून घोषित झाली.

हेही वाचा - शाळांकडून विद्यार्थ्यांचा डाटा लिक; बाह्य एजन्सीला माहिती पुरवल्यास कारवाई

लोणार सरोवर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण असून हे सरोवर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले असल्याचे वनमंत्री राठोड म्हणाले. हे सरोवर  प्राचीन असून या सरोवराची निर्मिती ही उल्कापातापासून झाली आहे. हे वर्तुळाकार असे मोठे सरोवर आहे. या सरोवराला कोठूनही पाण्याचा पुरवठा नसल्याने व साठलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने येथील पाणी खारट झाले असल्याचे ही वनमंत्री म्हणाले. 

या सरोवरात काही सायनो बेक्टरीया आणि फायटोप्लांक आढळून येतात. सरोवराच्या आजूबाजूच्या परिसरात पक्ष्यांच्या 160 प्रजाती , सरपटणार्‍या प्राण्यांच्या 46 प्रजाती तर 12 प्राण्यांच्या प्रजाती आढळून येतात. या सरोवराची खोली सरासरी 137  मीटर आहे. या सरोवराचा व्यास हा 1.80 किलोमीटर असून त्याचे क्षेत्र हे 113 हेक्टर इतके असल्याची माहिती ही वनमंत्री राठोड यांनी दिली.

इराण मधील रामसर या शहरात 1971 मध्ये आंतराष्ट्रीय रामसर परिषद पार पडली होती. या परिषदेमध्ये जागतिक स्तरावरील महत्वाच्या पाणथळ साईट घोषित करून या साईटचे संरक्षण व संवर्धन करायचे असा महत्वपूर्ण करार करण्यात आला होता. जैवविविधता व परिस्थितिकीच्या दृष्टीने जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या साइट या रामसर साइट म्हणून घोषित केल्या जातात.

हेही वाचा - 'ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला, आमच्या आंदोलनला यश' - आचार्य तुषार भोसले

यापूर्वी नांदूर मध्यमेश्वर ही राज्यातील पहिली रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित झाली होती. आता लोणार ही राज्यातील अशा प्रकारे घोषित होणारी दुसरी साईट आहे. लोणार सरोवर ही रामसर साईट म्हणून  घोषित झाल्याने जागतिक पर्यटकांचा ओघ या साईटकडे वाढणार आहे. निसर्ग पर्यटनाच्या अनुषंगाने  लोणार सरोवर परिसर निसर्ग पर्यटन विकासाचा आराखडा  तयार करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत लोणार सरोवर पर्यटन विकासाबाबत आपली चर्चा झाली असून पर्यटन विभाग व वन विभाग संयुक्तपणे यासाठी काम करेल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली .

 

Lonar Sarovar has been declared as the second Ramsar wetland site in the state
-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonar Sarovar has been declared as the second Ramsar wetland site in the state