बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान ; टॉमेटोचे पीक गेले वाया 

अमोल सांबरे
Friday, 6 November 2020

विक्रमगड तालुक्‍यातील ओंदे गावातील तरुण शेतकरी सूचित घरत याने आपल्या 10 गुंठा जागेत पॉलिहाऊस तयार करून सिजेंटा सिडस कंपनीचे टोमॅटो बियाणे आणून त्याची लागवड केली होती; मात्र हे बियाणे बोगस निघाल्याने या टोमॅटोच्या झाडांना फळधारणा झालीच नाही.

विक्रमगड ः विक्रमगड तालुक्‍यातील ओंदे गावातील तरुण शेतकरी सूचित घरत याने आपल्या 10 गुंठा जागेत पॉलिहाऊस तयार करून सिजेंटा सिडस कंपनीचे टोमॅटो बियाणे आणून त्याची लागवड केली होती; मात्र हे बियाणे बोगस निघाल्याने या टोमॅटोच्या झाडांना फळधारणा झालीच नाही. सूचितने 10 गुंठे जागेत 9 हजारांचे टॉमेटो बियाणे आणले होते; तर त्यांनतर जवळपास 4 महिने मजुरी खर्च, खत, औषध यासाठी त्याचे जवळपास एक लाखांपर्यंत खर्च झाला. यातून त्याला 4 ते 5 लाख रुपयांचा नफा अपेक्षित होता; मात्र एक लाखांच्या खर्चाबरोबरच शेतकऱ्याचे कष्ट आणि खर्ची पडलेली वेळ वाया गेली आहे. या बोगस बियाण्यांमुळे आपल्याला 6 लाखांचा फटका बसल्याचे सांगितले. 

दिवाळीसाठी नागरिक उत्साही, मात्र तडजोडीनेच यंदाची दिवाळी करणार साजरी

याबाबत सूचित घरत यांनी विक्रमडचे तालुका कृषी अधिकारी आर. यू. इभाड यांच्याकडे टोमॅटोच्या बोगस बियाण्याबाबत लेखी तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी तसेच कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे, पंचायत समिती विक्रमगडचे कृषी अधिकारी एस. एस. ठाकरे यांच्या समितीने केलेल्या पाहणीत त्यांना हे बियाणे सदोष आढळले असून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत येथे फूल आणि फळधारणा झाली नसल्याचा अहवाल त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर यांना पाठविला आहे. 

कोरोना दिवाळी! सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

बोगस बियाण्यांमुळे माझे खूप मोठे नुकसान झाले असून वेळही वाया गेला आहे. त्यामुळे कंपनीने याबाबत मला पूर्ण नुकसानभरपाई द्यावी. 
- सूचित घरत, 
(शेतकरी, ओंदे, विक्रमगड) 

 
विक्रमगड तालुक्‍यातील ओंदे येथील शेतकरी सूचित घरत यांना आमच्या कंपनीने बियाणे दिले आहे. आम्ही सदर टोमॅटो पिकाची पाहणी केली असून अहवाल पुढे पाठविला आहे. नुकसानभरपाई देण्याबाबत आमचे वरिष्ठांशी बोलणे चालू आहे. 
- शिरीष शिंदे, प्रतिनिधी, सिजेंटा 
 

 Loss of farmer due to bogus seeds   

(संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of farmer due to bogus seeds