esakal | चक्रीवादळाचा धोका, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
sakal

बोलून बातमी शोधा

चक्रीवादळाचा धोका, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

चक्रीवादळाचा धोका, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: अरबी समुद्रात (arbian sea) कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) तयार होत असून, त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. भारताच्या हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला निसर्ग या चक्रीवादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता. (Low pressure belt in arbian sea cyclone warning)

दिनांक 14 ते 16 मे 2021 दरम्यान ही परिस्थिती उद्भवणार आहे. यावेळी 40 ते 60 कि. मी. वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. नागरिकांनी समुद्रकिनान्यावर पोहण्यासाठी जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा ही निवासी उपजिल्हाधिकारी रायगड डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिला आहे.

अरबी समुद्रातील बदलणाऱ्या हवामानामुळे 16 मेच्या सुमारास दक्षिण कोकण परिसरात वेगवान वारे आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारी करणाऱ्या बोटींनी 14 तारखेपर्यंत किनाऱ्यावर परतावं असा इशारा हवामानखात्यानं दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 मेच्या सकाळपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं. लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र तिथून चक्रीवादळ पुढे कुठल्या दिशेनं सरकेल, हे आत्ताच सांगता येणार नाही.

इथून चक्रीवादळ पश्चिमेला ओमानच्या दिशेनं सरकू शकतं. ते पूर्वेला सरकलं, तर आधी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशात त्याचा प्रभाव जाणवू शकतो आणि तिथून ते पुढे उत्तरेला गुजरात किंवा दक्षिण पाकिस्तानकडे सरकू शकतं. याविषयीची निश्चित माहिती पुढच्या एक दोन दिवसांतच मिळू शकेल असे हवामान विभागाने कळवले आहे.

हेही वाचा: १५२ वर्षांपेक्षा जुन्या वांद्रे स्थानकाला मिळणार नवा लूक

हिंदी महासागराच्या उत्तरेला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एरवी मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती झालेली दिसते. यंदा मात्र मेच्या मध्यावर पहिलं वादळ अरबी समुद्रात निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

वादळ किनाऱ्यावर येण्याची शक्यता विचारात घेवून सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीची तयारी म्हणून सर्व पूर्वतयारी करून ठेवावी. वूडकटर, जे.सी.बी. बॅटरी, जनरेटर, शोध व बचाव पथक इ. तत्पर ठेवण्यात यावे. वादळ व अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक तातडीच्या उपाय योजना कराव्यात असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी रायगड डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून दिले आहेत.