मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये एका महिन्यात 37 हजारांनी वाढ

मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये एका महिन्यात 37 हजारांनी वाढ

मुंबई: डिसेंबर 2020 मध्ये मुंबईतून कोरोना हद्दपार होईल अशी चिन्हे दिसत असताना फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून सक्रिय रुग्ण संख्येत ही झपाट्याने वाढ होत आहे. एका महिन्यात तब्बल 37,763 सक्रिय रुग्ण संख्येत वाढ झाल्याने पालिकेसह राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळेपासून कोरोना विरोधात लढा सुरु आहे. पालिका व राज्य सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र डिसेंबर 2020 मध्ये दिसत होते. परंतु मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडकली असून पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पहावयास मिळत आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून सक्रिय रुग्ण संख्येत ही झपाट्याने वाढ होत आहे. 1 मार्चला सक्रिय रुग्ण संख्या 9 हजार 690 वर आली होती. परंतु, कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असून सक्रिय रुग्ण संख्येत वाढ होत आहे. 29 मार्चला सक्रिय रुग्ण संख्या तब्बल 47 हजार 453 वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ आरोग्य विभागासह मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

मार्चमधील सक्रिय रुग्णांची आकडेवारी

1 मार्च - 9,690 
15 मार्च - 14,582 
25 मार्च - 33,691
29 मार्च - 47,453

मुंबईतील अनेक भागांत रुग्णदुपटीचा कालावधी 50 दिवसांच्या आत

मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. यातील बहुतांश रुग्ण पश्चिम उपनगरातील असून तेथील रुग्ण दुपाटीचा दर 50 दिवसांच्या आत आला आहे तर रुग्णवाढीचा दर दुपटीने वाढला आहे. मुंबईमधील रुग्णदुपटीचा कालावधी हा दीड वर्षावर गेला होता. तो आता कामालीचा कमी झाला असून सरासरी 58 दिवसांवर घसरला आहे. वांद्रे पश्चिम भागात (एच-पश्चिम) हा दर 43 दिवसांवर, चेंबूर पश्चिम भागात (एम-पश्चिम) 44 दिवसांवर, गोरेगावमध्ये (पी-दक्षिण) 45 दिवसांवर, अंधेरी पश्चिममध्ये (के-पश्चिम) आणि घाटकोपरमध्ये (एन) प्रत्येकी 50 दिवसांवर आला आहे. मुंबईमधील अन्य भागांच्या तुलनेत 'बी' विभाग कार्यालयाच्या हद्दीत (सॅण्डहस्स्ट रोड आणि आसपासचा परिसर) रुग्णदुपटीचा काळ 133 दिवसांवर आहे.

मुंबईतील अनेक भागात रुग्णवाढीचा दर अर्धा टक्क्यांवर आला होता. त्यात देखील आता वाढ झाली आहे. वांद्रे पश्चिम भागात रुग्णवाढीचा दर अधिक आहे. मुंबईमधील रुग्णवाढीचा दर सरासरी 1.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. वांद्रे पश्चिम परिसरात हा दर 1.65 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीच्या यादीत चेंबूर पश्चिम परिसर दुसऱ्या क्रमांकावर असून, या भागात रुग्णवाढीचा दर 1.59 टक्के आहे. गोरेगाव परिसरात (पी-दक्षिण) हा दर 1.55 टक्क्यांवर पोहोचला आहे. महापालिकेच्या 'बी' विभाग कार्यालयाच्या हद्दीतील (सॅण्डहर्स्ट रोड आणि आसपासचा परिसर) रुग्णवाढीचा दर सर्वाधिक कमी म्हणजे 0.52 टक्के आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 लाखांच्या वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या अखेरीस नियंत्रणास आली होती. मात्र, फेब्रुवारीत पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. पश्चिम उपनगरांतील रुग्णवाढीचा वेग अन्य भागांच्या तुलनेत अधिक आहे. बोरिवली, अंधेरी (पूर्व-पश्चिम), मालाड परिसर रुग्णवाढीत आघाडीवर आहेत. अंधेरी (पश्चिम) भागातील सक्रिय रुग्णांची संख्या 29 मार्च रोजी 3 हजार 855 होती. या भागातील एकूण 23 हजार 325 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 589 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येच्या यादीत हा भाग आघाडीवर आहे. त्याखालोखाल बोरिवलीमध्ये 2 हजार 705 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. या भागात आतापर्यंत 667 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 23 हजार 700 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. अंधेरी (पूर्व) भागातील 19 हजार 578 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 2 हजार 302 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. मालाडमध्येही 2 हजार 157 रुग्ण उपचाराधीन असून, आतापर्यंत 19 हजार 767 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्यस्थिती पाहता अन्य भागांच्या तुलनेत या परिसरातील सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com