महाड सरपंच हत्या :“माझ्या आईला तो आत्या म्हणायचा, मग असं का केलं?” | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahad Reportaj

आदिस्ते गावातील महिलेचा सोमवारी (ता. २७) जंगलात खून झाला. एका महिला सरपंचाच्या खून प्रकरणाला राजकीय किनार देण्याचा प्रयत्न झाला.

महाड सरपंच हत्या : 'माझ्या आईला तो आत्या म्हणायचा, मग असं का केलं?'

महाड : माझं लग्न ठरलं आहे. १९ फेब्रुवारी ही तारीखही निश्‍चित झाली. लग्नपत्रिका, धान्य, बस्ता खरेदीची लगबग सुरू होती. असे सगळे आनंदी वातावरण असतानाच आईचे असे होईल, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. ‘आमचे असे काय चुकले’, असा सवाल महाड तालुक्यातील आदिस्तेच्या सरपंच यांच्या मुलाचा आहे. आदिस्ते गावातील महिलेचा सोमवारी (ता. २७) जंगलात खून झाला. एका महिला सरपंचाच्या खून प्रकरणाला राजकीय किनार देण्याचा प्रयत्न झाला. अतिदुर्गम भागात महिला सरपंच म्हणून काम करताना कोणत्या अडचणी येतात, लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गमावणाऱ्या पुरुषांची मानसिक स्थिती, वाढलेले कौटुंबिक कलह याचे हे विदारक वास्तव आहे. प्रत्यक्ष आदिस्ते गावात जाऊन या वस्तुस्थितीचा मांडणारा हा रिपोर्ताज...

रायगड : जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला आंबेतचा पूल ओलांडून आम्ही रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात प्रवेश केला. एका बाजूला सावित्री नदी आणि दुसऱ्या बाजूला हिरव्यागार डोंगररांगांतून आंबेत- गोमेंडी मार्गाने आमची दुचाकी चालली होती. रोहण फाटा मार्गाने आदिस्ते (Adiste) गावाकडे जाण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. उबट आळी येथे तुडिळ येथून थेट रस्ता आहे. मात्र, आम्हाला गावचे पोलिस पाटील जयदास जाधव (Jaydas Jadhav) आणि ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्यायची होती, म्हणून मूळ आदिस्ते गावात जाण्याचे ठरवले. रोहण फाटा सोडल्यावर कच्च्या रस्त्याने जाताना आता कुडा- मातीने बांधलेली घरे दिसू लागली. अगदी मागासलेला भाग असल्याचे पदोपदी दिसत होते. पोलिस पाटील जयदास जाधव हे याच महिलेच्या खूनप्रकरणी महाड (Mahad) येथे गेले होते. गावातील वातावरणाची चाचपणी करण्यासाठी गावातील दुकानात थांबलो. अस्मिता जाधव या बाईंचे हे दुकान होते. त्यांनीच आम्हाला एक वाटाड्या दिला. सुतारडोंड, खैराडेवाडी, उबटआळी, आदिवासीवाडी आणि मूळ गाव आदिस्ते अशा सात वाड्यांची एक ग्रामपंचायत असलेल्या आदिस्ते ग्रामपंचायतीचे कार्यालय बंद होते. यामुळे उबटआळीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. याच आळीमध्ये संबंधित महिलेचे घर आहे. खूप वेळ विनंती केल्यानंतर वाटाडे मोहन जाधव हे उबट आळीमध्ये घेऊन जाण्यास तयार झाले. इतक्या खराब रस्त्याने आल्यानंतर पुन्हा अर्धा किलोमीटर चालत जाण्याच्या विचाराने माझे पाय गळून पडले होते. जंगलातून अगदी ४५ अंशाची चढण चढून आम्ही उबटआळीत पोहचलो. वाटाड्याने आम्हाला या प्रकरणातील आरोपी अमीर जाधव कुटुंबाच्या घरात थांबवले. घरात अमीर जाधवचा मोठा भाऊ समीर होता. त्याच्याबरोबर संवाद साधला.

समीर यांनी सांगितले की, अमीर असे काही करू शकेल याची आम्हीही कल्पना केली नव्हती. दोन वर्षांपूर्वी अमीरचे लग्न झाले होते. त्यानंतर लगेचच लॉकडाऊन लागल्याने तो कुटुंबासह गावात आला. तो परत गेलाच नाही. आदिस्ते गावच इतका दुर्गम आणि जंगल भागात असल्याने हाताला कोणताच कामधंदा नव्हता. अशा परिस्थितीत त्याची बायको कामधंदा शोधण्यासाठी मुंबईला परत गेली. यामुळे त्याची सतत चिडचिड होत होती, असे समीर यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने या गावचा विकास रखडला आहे. खून प्रकरणापूर्वी या दुर्गम गावाकडे विकासाच्या बाबतीत आतापर्यंत कोणाचेही लक्ष गेले नाही. गावात पाचवीपर्यंतच शाळा आहे. या शाळेत येण्यासाठीही लहान लहान मुलांना जंगलातून यावे लागते; तर पुढील शिक्षणासाठी तुडिल, वलंग किंवा मुंबईत जावे लागते. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थांचे शिक्षण हे पाचवीपर्यंतच झाले आहे. मृत महिलेने आपल्या एकुलत्या एक मुलाला बारावीपर्यंत शिक्षण दिले आहे. तो अंधेरी जे. बी. नगर येथील एका कार्पोरेट कंपनीत काम करतो. कमी शिक्षणाचे बहुतांश गावकरी मुंबईत हॉटेलमध्ये वेटर म्हणून, नाहीतर घरगडी म्हणून कामे करतात. लग्न झालेल्या बहुतांश महिलादेखील मोलकरीण म्हणून मुंबईत काम करतात.

मुलांना लहानपणापासूनच आपल्या भविष्यासाठी संघर्ष करावा लागतो. वन्यप्राणी आणि डोंगराळ भागातील एकपिकी शेती न परवडणारी. गावात रोजगाराचे साधन नाही, शिक्षण नाही, अशा परिस्थितीत गावात जन्माला येणारा मुलगा दहा- बारा वर्षांचा झाला की त्याला गाव सोडून नशीब आजमवण्यासाठी आई-वडिलांपासून दूर जावे लागते.

गावात तरुण दिसत नाही, याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर वाटाड्या माहिती देत होता. याचदरम्यान आमचे छायाचित्रकार समीर मालोदे गावातील वातावरण कॅमेरात बंदिस्त करण्याचे प्रयत्न करीत होते. उबटआळीतील २८ घरांमधील साधारण १५० लोकसंख्येपैकी फक्त पाच पुरुषच गावात असल्याने गावातील अडीअडचणीला धाऊन जाण्यात सरपंच बाई अग्रेसर असायच्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर कोण धावून येणार, असा प्रश्न आता गावकऱ्यांनाही सतावत आहे. तारखेप्रमाणे त्यांचे बारावे शनिवारी (ता. ८) होणार होते; परंतु गावात पुरुष मंडळी नसल्याने रविवारी ठेवण्यात आले आहे. मुंबईकरांना गावात येण्यास रविवार सोयीचा पडेल, या दृष्टीने वार पुढे ढकलण्यात आल्याचे गावकरी सांगत होते.

जाधव कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर आम्ही मृत सरपंच महिलेच्या घराकडे निघालो. अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर गावच्या मधोमध घर सरपंचाचे घर आहे. अगदी घरातील गरिबी स्पष्ट दिसत होती. साधारण ६० वर्षे वय असलेले सरपंचबाईंचे अशक्त पती हे बाहेरच बसले होते. आम्ही अंगणात प्रवेश केल्यावर गावातील तीन- चार पुरुष जमा झाले. इतकेच पुरुष गावात असल्याचे वाटाडे मोहन जाधवांनी सांगितले.

सरपंचबाईंचा मुलगा येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी मोठे गमावल्याचे दिसत होते. आमच्याशी चाललेल्या चर्चेत आता अमीरचा भाऊ समीरदेखील सहभागी झाला. दोन्ही कुटुंबात कोणताच वाद नसल्याचे दिसत होते. सर्व जण मनमोकळ्या गप्पा मारत होते. गावची माहिती देत असताना अमीरने असे का केले, असाच सर्वांचा प्रश्न होता. आमचा यावर विश्वासच बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गावात भीतीचे वातावरणही नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वीच या गावच्या महिला सरपंचाचा खून झाल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आले होते. प्रसारमाध्यमांमध्ये भल्या मोठ्या बातम्या येत होत्या. मात्र, अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना काहीही थांगपत्ता नव्हता. दगड-मातीची कौलारू घरे असलेल्या या गावात कमालीची स्वच्छता दिसून येत होती. या व्यतिरिक्त गावात शिक्षण, दळणवळण, संपर्क, आरोग्य अशा हजारो समस्या आ वासून आहेत. गावातील वयोवृद्ध आनंदाने आपल्या आयुष्याची सायंकाळ अनुभवत आहेत.

पीडित महिला सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान जंगलात सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी त्यांचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला होता. गावचे पोलिस पाटील जयदास जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड तालुका पोलिसांनी नऊ जणांचे पथक तयार करून तपास सुरू केला. महिला सरपंचाचा खून झाल्याने हे प्रकरण तितकेच संवेदनशील झाले होते. बलात्काराचे प्रकरण असल्याने ग्रामसेवकासह सर्व सदस्यांना पोलिसांनी तपासासाठी घेतल्याचे जयदास जाधव सांगतात.

पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्वानपथक, त्यांच्या गाड्या यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दिवस-रात्र गावात पोलिस असल्याने त्या ठिकाणी पोलिस पाटील म्हणून मला राहावे लागत होते. त्यामुळे तीन दिवस मलादेखील झोप लागली नाही, असे पोलिस पाटील जयदास जाधव यांनी सांगितले. या प्रकरणात अमीर शंकर जाधव (३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश तांबे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पूर्वीच्या भांडणाचा राग धरून आरोपीने महिलेला जीवे ठार मारल्याची कबुली दिल्याचे या वेळी पोलिसांनी सांगितले.

जीव गमावणाऱ्या सरपंच या ग्रामपंचायत कशा संभाळायच्या, याबद्दल उपसरपंच महेंद्र दवंडे यांनी सांगितले की, त्या कधीही कोणाबरोबर भांडण करत नसत. सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांनी नुकतेच घरकुल योजनेचे २७ प्रस्ताव पाठविले. वाद नको म्हणून आलेल्या सर्व प्रस्तावांना सरसकट मंजुरी देण्यात आली. त्या सरपंच झाल्या आणि लॉकडाऊन झाले. त्यामुळे विकास निधी आणण्यास त्यांना फारशी संधी मिळाली नसली, तरी त्यांनी खैराडे- आदिस्ते रस्ता, आदिस्ते स्मशानभूमी अशी काही कामे केली आहेत. इतर मागास प्रवर्ग (महिला) उमेदवाराच्या आरक्षणातून त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षाने बहुमताने सरपंच म्हणून विजयी केले होते. त्या थेट मतदारांमधून निवडून आलेल्या सरपंच होत्या. गावात पुरुष मंडळी नसल्याने गावच्या कारभाराची जबाबदारी समर्थपणे संभाळणाऱ्या सरपंच महिलेचे अत्यंत वाईट झाले. गावातील एका छोट्या वादातून त्यांना जीव गमवावा लागला. यामुळे ग्रामीण भागात महिला सरपंचांना कोणत्या अडचणी येतात, याची जाणीव सर्वांना होत आहे, असेही दवंडे यांनी सांगितले.

उपसरपंचाबरोबर चर्चा केल्यानंतर आता गावातून निघण्याची वेळ झाली होती. सायंकाळचे ६ वाजले होते. गाडी सुरू केली तेव्हा घरातून १२७ किलोमीटरचा प्रवास केल्याचे ‘इंडिकेटर’ने दाखवले, आता तितकाच प्रवास करून परत घराकडे जायचे होते.

...आणि आत्याचा घात केला

आदिस्ते या लहानशा गावात कुणबी समाजातील परस्पर नात्यातील कुटुंब असल्याने सरपंच या नात्याने पीडितेने अमीरला समजावले. कदाचित हेच त्याला खटकले असावे. पीडित महिलेला तो आत्या म्हणून हाक मारायचा. आत्याच्या खून प्रकरणात अमीर जाधववर आता गंभीर आरोप आहेत. ४ जानेवारीपर्यंत त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. या गुन्ह्याची कबुलीदेखील त्याने दिली आहे. मात्र, त्याने हे पाऊल का उचलले, त्याला असे का करावे लागले, अशा कोणत्या कारणाने त्याचा राग उफाळून आला, असे हजारो प्रश्न अनुत्तरित आहेत.

जंगल गावाला लागलेले असल्याने रात्र झाल्यावर कोणीही घराबाहेर पडत नाही. सरपंचबाईंचे उबटआळी हे गाव एकदम दुर्गम तितकेच मागासलेले असल्याने आजारी माणसाला तत्काळ रुग्णालयात पोहचवण्याची कोणतीच सुविधा नाही. गावात कोणत्याच मोबाईलला रेंज नाही. त्यामुळे गावात कोणती दुःखद घटना घडल्यास तुडिल किंवा वलंग येथे येऊनच संपर्क साधावा लागतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mahad
loading image
go to top