esakal | सरकारच्या आवाहनाला भीम अनुयायांची दाद,अत्यल्प अनुयायांची उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारच्या आवाहनाला भीम अनुयायांची दाद,अत्यल्प अनुयायांची उपस्थिती

. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन अभिवादन करण्याच्या सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला अनुयायांनी चांगली दाद दिली.

सरकारच्या आवाहनाला भीम अनुयायांची दाद,अत्यल्प अनुयायांची उपस्थिती

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई:  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना देशभरातून अभिवादन करण्यात आले. दरवर्षी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळतो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा अत्यल्प अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊन महामानवाला अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन अभिवादन करण्याच्या सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला अनुयायांनी चांगली दाद दिली. त्यामुळे यंदा चैत्यभूमी परिसरात अत्यंत तुरळक अनुयायी अभिवादनासाठी आले. तसेच थेट प्रक्षेपणामुळे लाखो अनुयायांनी घरबसल्या बाबासाहेबांना अभिवादन केले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, महापौर किशोरी पेडणेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांनी बाबासाहेबांना वंदन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटतो. चार दिवसांआधीच चैत्यभूमीवर बाबासाहेबांचा क्रांतीचा मळा फुलतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी करू नका, घरातूनच ऑनलाईन अभिवादन करा असे आवाहन राज्य सरकार आणि महापालिकेने केले होते. त्याला अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यासाठी थेट प्रक्षेपणही करण्यात आले, त्याला प्रतिसाद देत भीम अनुयायांनी ऑनलाईन अभिवादन केले. चैत्यभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत संघटना आणि शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

अधिक वाचा- कोरोना काळात तब्बल 2 लाख मुंबईकरांची पाण्यासाठी वणवण

चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्टवृष्टी करण्यात आली. अनुयायांना चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदनेचे तसेच विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी शिवाजी पार्क परिसरात स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. गर्दी होऊ नये, यासाठी शिवाजी पार्क अणि चैत्यभूमी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई महापालिकेने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, सजावट आदी विविध सोयी, सुविधा उपलब्ध केल्या होत्या. बाबासाहेबांच्या विचारांवर भीमगीते, जलसा, विचारमंथनाचे कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत चैत्यभूमीसह चाळी, वसाहतीत आयोजित करण्यात आले. बाबासाहेबांच्या राजगृह निवासस्थान ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. चेंबूर येथील आंबेडकर उद्यान परिसर, वसाहतींतून तसेच समाज माध्यमांवर बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले.

दुपारी एक वाजेनंतर अनुयायी येऊ लागले

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी 1 डिसेंबरपासून अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल होतात. मात्र कोरोनामुळे यंदा अनुयायी चैत्यभूमीवर अधिक प्रमाणात दाखल झाले नाहीत. समता सैनिक दलाचे दरवर्षी राज्यभरातील सुमारे 5 हजार सैनिक अनुयायांच्या सेवेसाठी तत्पर असतात. मात्र यंदा केवळ 100 सैनिक गेल्या तीन दिवसांपासून चैत्यभूमी परिसरात आहेत. 5 तारखेला रात्री अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतील, अशी अशा होती. मात्र खूपच कमी लोक आहे. 6 तारखेला सकाळपासून केवळ राजकीय नेते वगळता अधिक अनुयायी उपस्थित नव्हते.  दुपारी 1 वाजेनंतर काही प्रमाणात अनुयायांनी चैत्यभूमीवर येण्यास सुरूवात केली. त्यामुळे काही तुरळक प्रमाणात चैत्यभूमी परिसरात अनुयायी दिसून येत होते. यामध्ये तरूण मुले, पुरूषांची संख्या अधिक होती. मात्र, वयोवृद्ध आणि कुटुंबासह येण्याचे अनेकांनी टाळल्याचे दिसून आले.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
दरवर्षी आम्ही संपूर्ण कुटुंबासह चैत्यभूमीला येतो. मात्र यंदा कोरोनामुळे आम्ही तीन मित्र येथे आलो आहोत. लोकल प्रवासाची व्यवस्था नसल्याने बसने चैत्यभूमी परिसरात पोहचलो. दर्शन मिळेल की नाही याची धाकधूक होती. मात्र दर्शन मिळाले. याचे समाधान वाटते.
बबन वानखेडे, कांदिवली, डहाणूकरवाडी 

चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना अल्पोपहार म्हणून माझा भाऊ दीपक बोराडे बिस्कीट आणि केळी वाटप करायचा. मात्र त्यांच्या निधनानंतर मी हे कार्य हाती घेतले आहे. कोरोना असला तरी अनुयायी अभिवादनासाठी येतीलच असा विश्‍वास होता. त्याप्रमाणे त्यांच्यासाठी केळी आणि बिस्किटांची व्यवस्था केली.
गौतम बोराडे, चेंबूर, महात्मा फुले नगर
----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mahaparinirvan Diwas Chaityabhoomi events Dr Ambedkar death anniversary

loading image