esakal | चैत्यभूमीला पोलिसांचा पहारा, शिवाजीपार्क पहिल्यांदाच मोकळे
sakal

बोलून बातमी शोधा

चैत्यभूमीला पोलिसांचा पहारा, शिवाजीपार्क पहिल्यांदाच मोकळे

चैत्यभूमी परिसरात अनुयायांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

चैत्यभूमीला पोलिसांचा पहारा, शिवाजीपार्क पहिल्यांदाच मोकळे

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावरही यंदा कोरोनाचे सावट पहाण्यास मिळत आहे. चैत्यभूमी परिसरात अनुयायांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. यामुळे यंदा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चैत्यभूमी परिसर अनुयायांशिवाय सुनासूना दिसत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने राज्य सरकारने अद्यापही काही निर्बंध कायम ठेवले आहेत. दरवर्षी महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर 1 डिसेंबरपासूनच दाखल होत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी करू नये, असे आवाहन राज्य सरकार, महापालिका आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेले नाहीत.

अधिक वाचा-  येत्या तीन महिन्यात कोविड लसीचे साठवणूक केंद्र तयार होणार

दरवर्षी भीम अनुयायांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या रस्त्यांवर यंदा शुकशुकाट आहे. शिवाजी पार्क मैदानात महापालिकेकडून अनुयायांसाठी विविध सुविधा पुरविण्यात येतात. मात्र यंदा कोणतीही सुविधा पुरविण्यात आलेली नाही. अनुयायांअभावी यंदा शिवाजी पार्क मैदानही रिकामेच दिसत आहे. दरवर्षी पुस्तके, विविध साहित्य विक्रीसाठी येणारे विक्रेतेही यंदा आलेले नाहीत. यामुळे मैदान मोकळे असून नेहमीप्रमाणे मैदान खेळासाठी खुले असल्याने विविध खेळ सुरू आहेत. त्याचप्रमाणे व्यायाम करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ येथे पहाण्यास मिळत आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मैदानात कोणी राहू नये, यासाठी शिवाजी पार्कमध्ये पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिस असल्याने या परिसराला पोलिस छावणीचे रूप आले आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे विविध नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन पर बॅनर या परिसरात लावले आहेत. दरवर्षी शिवाजीपार्क मैदानात येणारी लाखोंची गर्दी यंदा गायब आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mahaparinirvana Day 6th December Police Security At shivaji park dadar

loading image
go to top