बरोबर २८ दिवसांनी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला लसीचा दुसरा डोस

दीनानाथ परब
Thursday, 8 April 2021

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेताना, मुख्यमंत्र्यांसोबत...

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. जे.जे. रुग्णालयात त्यांनी हा डोस घेतला. यापूर्वी मागच्या महिन्यात ११ मार्चला त्यांनी जे.जे. रुग्णालयातच कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. बरोबर २८ दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी आज दुसरा डोस घेतला. यावेळी राज्याचे मुख्यसचिव सिताराम कुंटे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही लस घेतली. 

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लसीकरण हाच या साथीच्या आजाराला आटोक्यात आणण्याचा सध्याचा एकमेव उपाय आहे. लसीकरणामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती होते. लसीकरणानंतरही कोरोनाची बाधा होऊ शकते. पण लस घेतलेली असल्यामुळे कोरोना तितका घातक नसेल. 

'वास्तव नाकारुन चालणार नाही', शरद पवारांनी महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेताना, मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. मात्र काही दिवसांपूर्वी आदित्य आणि रश्मी ठाकरे दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. आदित्य ठाकरे यांनी घरीच उपचार घेतले. पण रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray took his second dose of COVID vaccine