‘मविआ’ च्या काळात प्रकल्प राज्याबाहेर; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

‘मविआ’ च्या काळात प्रकल्प राज्याबाहेर; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा घणाघात

मुंबई : ‘महाविकास आघाडीच्या काळातच महत्त्वाच्या उद्योगांनी राज्यातून काढता पाय घेतला. पण त्याचवरून आता आमच्यावर टीका केली जात आहे,’ असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांवर केला.

गेलेल्या प्रकल्पांचे कारण पुढे करून राज्यातील गुंतवणूक रोखण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘नाणार’च्या प्रकल्पाला कोणी विरोध केला? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

फडणवीस म्हणाले की, ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना फॉक्सकॉन येथे उद्योग उभारणार नाही असे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले होते. टाटा- एअरबस प्रकल्पाविषयी आमचे सरकार असताना ज्या हालचाली सुरू झाल्या त्याबाबत विपरीत घडते आहे असे कानावर आले. मी विरोधी पक्ष नेता होतो तरी या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो.

महाराष्ट्रातून बाहेर पडू नका, अशी विनंती त्यांना केली. त्यावर त्या अधिकाऱ्याने राज्यातील वातावरण गुंतवणूक करण्यायोग्य नाही असे मला सांगितले. आम्ही बाहेर चाललो आहोत हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे तो अधिकारी म्हणाला होता. मात्र राजकारणापेक्षा हा प्रकल्प राज्यातून बाहेर जाऊ नये यासाठी मी प्रयत्न केले.

‘एमआयडीसी’च्या मुख्याधिकाऱ्यांना प्रकल्पात लक्ष घाला , या दुर्दैवी हालचाली मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा आणि नुकसान टाळा अशी विनंती केली होती. मी सर्वतोपरीने मदत करायला तयार होतो पण या संदर्भात एक साधे पत्रही गुंतवणूकदारांना लिहिले गेले नाही.

हा प्रकल्प २०२१ मध्येच गुजरातमध्ये स्थलांतरित झाला आणि आता खापर आमच्यावर फोडताहेत. नागपुरातल्या मिहानमधील सॅफ्रॉन प्रकल्पाबाबत तर कहर झाला आहे. जो कारखाना २०२१ मध्ये हैदराबादला उभा राहिला तो या आठवड्यात महाराष्ट्रातून बाहेर गेला असे कसे म्हणता येईल. हा खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे. ’’

पंतप्रधान मोदींबाबत अपप्रचार

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातेत का जातात या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले ,‘‘ खरे तर मागील सरकारच्या अनास्थेमुळे गेल्या अडीच वर्षांत दुर्दैवाने बरेच प्रकल्प बाहेर गेले. पण गुजरातेत गेलेल्या प्रकल्पांकडे आपले विशेष लक्ष जाते.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे प्रकल्प गुजरातेत जातात काय? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा अपप्रचार असल्याचे असल्याचे सांगितले.

मोदींच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली आहे असे ते म्हणाले. आज महाराष्ट्रात जे उद्योग स्थापन होण्याची घोषणा झाली आहे त्यामुळे आपल्या राज्यात इलेक्ट्रॉनिक क्लस्टर स्थापन होईल,भविष्यात हाच उद्योग सर्वात महत्त्वाचा असेल असेही त्यांनी सांगितले.

रिफायनरी राज्यातच होणार

महाराष्ट्रातून गुंतवणुकीचा बाप असलेल्या रिफायनरीला विरोध का केला गेला? असा प्रश्न फडणवीसांनी विरोधकांना केला. ‘नाणार’ आपल्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात गुंडाळल्या गेले हे लक्षात आणून देताच ते म्हणाले ,‘‘ माझे तेव्हाचे ट्विट स्पष्ट होते की रिफायनरी ‘नाणार’ला होणार नाही.

मात्र रिफायनरी महाराष्ट्रातच होईल. बारसू की कुठे ते कालांतराने स्पष्ट होईलच. सध्या परकी तसेच देशांतर्गत गुंतवणूक खेचण्यासाठी सगळी राज्ये प्रयत्न करत आहेत. २५ राज्ये एकेका गुंतवणूकदाराशी संपर्क साधतात त्यातील १० तगडे प्रतिस्पर्धी असतात. मात्र भविष्यात महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येईल , बाहेर गेलेल्या प्रकल्पांची हानी भरून काढू.’’

महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जाणे योग्य नाही. प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच कसा जातोय? हे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला हवी.

- राज ठाकरे, अध्यक्ष मनसे