
परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास पोलीस महासंचालकांचा नकार
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी असमर्थता प्रगट केली आहे. ठाकरे सरकारसाठी हा एक झटका आहे. परमबीर सिंह यांनी पदाचा गैरवापर केल्याचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या चौकशीचे आदेश गृहविभागाने दिले होते. पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचे अधिकार दिले होते.
पण संजय पांडे यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून परमबीर यांची चौकशी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावी अशी विनंती केली आहे. परमबीर यांनी माझ्यावर सुद्धा आरोप केले आहेत, त्यामुळे मी चौकशी करणं चुकीचं आहे, असं संजय पांडे यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते, तर सचिन वाजेची नियुक्ती केल्याचे आरोप परमबीर यांच्यावर आहे.
हेही वाचा: चांगली बातमी! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवसांवर
परमबीर यांच्यावरील आरोपांची चौकशी संजय पांडे हे करत होते. मात्र पांडे याचिका मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप परमबीर यांनी केला होता. संजय पांडे चौकशी करण्यास तयार नाहीयत. त्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेते? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सचिन वाजे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब फोडला होता. ज्याचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. थेट उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती.
(संपादन - दीनानाथ परब)
Web Title: Maharashtra Dig Sanjay Pande Refuse To Probe Of Parmbir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..