
मेट्रोचे जाळे उभारल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार - एकनाथ शिंदे
ठाणे : शहरी भागांमध्ये मेट्रोचे जाळे तयार करण्याचे काम सुरू असून या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांचा भार कमी होऊन कोंडीची (Traffic jam) समस्या सुटण्यास मदत होईल, असे मत नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी व्यक्त केले. पावसाळ्यापूर्वी मेट्रोच्या मार्गाखालील (Metro Project) रस्त्यांच्या दुरुस्तीची व सेवा रस्त्यांची कामे (Road repairing work) पूर्ण करावीत, असे निर्देश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेदेखील त्यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा: डोंबिवली : खरड गावात वीटभट्टीवर भीषण आग; मजुरांची घरं जळून खाक
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच रस्ते व रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो उपयुक्त आहे. यामुळे या प्रदेशातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मेट्रो ४ या मार्गामुळे वडाळा ते भिवंडीपर्यंतचा भाग जलद वाहतुकीने जोडला जाणार आहे. ठाण्यामधील मेट्रोचे काम अधिक गतिमान व्हावे यासाठी संबंधितांना सूचना केल्या आहेत. मुलुंडपासून ते कासारवडवलीपर्यंतच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या कामांचा आढावा घेऊन मेट्रो पिलरच्या ठिकाणी आवश्यक तेथेच बॅरेकेटिंग ठेवून इतर ठिकाणचे बॅरेकेटिंग काढून टाकण्यात येतील. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर कुठेही डेब्रिज, खड्डे राहू नयेत यासाठी सूचना दिल्या आहेत, असे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करा
वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्ग हा ठाणे शहरातून जात आहे. या मेट्रो मार्गाखालील रस्त्यांची सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच मेट्रोच्या पिलरखालील दुभाजकाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत. या ठिकाणी पावसामुळे पाणी साचून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश या वेळी पालकमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
खड्डे बुजवण्याचे आदेश
मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका भागात विद्युत कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी होत आहे. शिंदे यांचा दौरा या मार्गावरून जात असताना त्यांनी खड्ड्याच्या परिसरात वाहन थांबवून कामाची माहिती घेतली. हे काम तातडीने पूर्ण करून खड्डा बुजवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
Web Title: Traffic Jam Issue Will Be Solved As Metro Project Is In Process Says Minister Eknath Shinde Thane News Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..