फडणवीस महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या पांडेंच्या प्रचाराला जाणार का? गृहमंत्र्यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एम्सच्या अहवाल समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळा रंग देण्याचं काम राजकीय पक्षाने केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एम्सच्या अहवाल समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळा रंग देण्याचं काम राजकीय पक्षाने केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलं होतं त्यावरूनही गृहमंत्र्यांनी निशाणा साधला. सध्या सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. एम्सने रिपोर्ट सोपवल्यानंतर आता सीबीआय काय सांगणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. 

एका राजकीय पक्षाने दिलं वेगळं वळण
राज्यातील पोलिसांना बदनाम करण्याचा कट गेल्या तीन चार महिन्यात रचला गेला. यासाठी संबंधितांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांना जनता माफ करणार नाही. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला ज्या पद्धतीने रंगवण्यात आलं त्यामागे राजकीय पक्षाचा हात होता असाही दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. 

महाराष्ट्राचे नेतृत्व केलेल्यांनीच राज्याला बदनाम केलं
सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केल्याचा शेरा दिला होता. मात्र ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले त्यांनीच मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केले. महाराष्ट्रासह मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असंही अनिल देशमुख म्हणाले. 

हे वाचा - सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षड्यंत्र; 80 हजार फेक अकाउंटचा वापर

पांडेंच्या प्रचाराला जाणार का?
सुशांतच्या मृत्यू प्रकऱणात रस दाखवणारे आणि मुंबई पोलिसांवर टीका करणारे गुप्तेश्वर पांडे आता राजीनामा देऊन निवडणूकीत उतरले आहेत. त्याच बिहारमध्ये आता फडणवीस पांडेंच्या प्रचारासाठी जाणार का असा सवालही गृहमंत्री देशमुख यांनी केला. 

सीबीआयने लवकर खुलासा करावा
एम्स आणि कूपरच्या रिपोर्टमध्ये विष आढळलं नाही. पाच तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टमधून जे काही समोर आलं त्याबाबत सीबीआयने आता खुलासा करावा. महाराष्ट्रच नाही तर देश वाट बघत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra home minister anil deshmukh press conference on sushant singh rajput case