निष्ठावंतावर अन्याय, बाहेरच्यांना न्याय ! विधानपरिषद उमेदवारांच्या यादीमुळे भाजपमध्ये खदखद वाढली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहिर झाल्यानंतर पक्षातील खदखद वाढली आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या जेष्ठ नेत्यांना डावलून बाहेरुन आलेल्यांना आमदारकीची संधी देण्यात आल्यामुळे पक्षातील अनेक नेते संतप्त झाले आहेत.

मुंबई  : भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहिर झाल्यानंतर पक्षातील खदखद वाढली आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या जेष्ठ नेत्यांना डावलून बाहेरुन आलेल्यांना आमदारकीची संधी देण्यात आल्यामुळे पक्षातील अनेक नेते संतप्त झाले आहेत. बाहेरुन आलेल्यांना संधी देण्याचा हा पांयडा चुकीचा आहे, अशी भावना बहुतांश नेत्यांची आहे. पक्षात काही नेत्याची एकाधिकारशाही वाढल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे.

भाजपने विधान परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये दुसऱ्या पक्षातून अलिकडेच भाजपमध्ये दाखल झालेल्या रणजितसिंह मोहिते पाटील, गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी  मिळाली आहे; तर नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके, नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांना पक्षाने संधी दिली आहे.

कसं असेल लॉकडाऊननंतरचं सार्वजनिक आयुष्य ? सुरु आहे 'या' पर्यायांचा विचार...

पाटील-फडणवीसांचा अंतिम शब्द : 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे यांना संधी देण्याची विनंती केल्याचे समजते; मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सुचवलेल्या उमेदवारांच्या नावावर केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गोपिचंद पडळकर, प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी मिळवून दिली; तर चंद्रकांत पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटीलांना  दिलेला शब्द पाळला.  

बाहेरच्यांना संधी : 

विधानसभा निवडणूकीत तावडे, खडसे, बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहीत यांचे तिकीट कापण्यात आले होते. याचवेळी बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी दिली गेली. निवडणूकीत भाजपचे संख्याबळ घटून 105 वर आले. पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले; मात्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद बाहेरुन आलेल्या प्रविण दरेकरांना मिळाले. यावेळी  निष्ठावंताना संधी मिळेल अशी आशा होती; मात्र ती फोल ठरल्याची खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. 

दुष्काळात तेरावा महिना! खासगी ट्रॅव्हल्सकडून मनमानी भाडेवसुली 

पक्षाअंतर्गत धुसफुस वाढणार : 

पक्षाचा पराभव होऊनही सर्वसमावेशक निर्णय घेतले जात नाही. ही पक्षातल्या नेत्यांची खरी खदखद आहे.  हे सर्व नाराज नेते लवकरच एकत्र येण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेतील बेदीली, काही जणांनी चालवलेली एकाधिकारशाही दिल्लीकरांच्या कानावर घालणे महत्वाचे असल्याची मत बहुतांश नेत्यांनी व्यक्त केले आहे.

सामाजिक संतुलनाचे काय? 

तीन ओबीसी, एक मराठा उमेदवार देऊन पक्षाने सामाजिक संतुलन राखल्याचा दावा केला आहे; मात्र विधानसभा निवडणूकीमध्ये पक्षापासून दूर गेलेल्या तेली, माळी, मांतग आणि  इतर समाजघटकांना जोडण्याचा प्रयत्न या उमेदवारांकडून झाल्याचे दिसले नाही. धनगर समाजातील डाॅ. महात्मे, महादेव जानकरांना पक्षाने वेळोवेळी संधी दिली. मग गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यामागची भूमिका काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. तेली समाजाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाला विदर्भात फटका बसला; मात्र त्याचाही पक्षाने विचार केला नाही. या चार उमेदवारांच्या यादीत एका महिलेला उमेदवारी मिळाली असती तर चांगला संदेश देता आला असता, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांना कुठलाही जनाधार नसताना उमेदवारी मिळाल्याचा आक्षेप बहुतांश नेत्यांचा आहे.

Maharashtra MLC election word of fadanvis and chandrakant patil is final from center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra MLC election word of fadanvis and chandrakant patil is final from center