Eknath Shinde : आम्ही विचारांचे वारसदार; CM शिंदेंच्या मेळाव्याचं पोस्टर बघितलंत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde

Eknath Shinde : आम्ही विचारांचे वारसदार; CM शिंदेंच्या मेळाव्याचं पोस्टर बघितलंत का?

Eknath Shinde Dasara Melava Poster : दसरा जसा जसा जवळ येऊ लागला आहे तशी तशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. दोन्ही गटांकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे पोस्टर समोर आलं असून, यात मेळाव्याचं ठिकाण बीकेसीचं असल्याचं छापण्यात आले आहे. त्यामुळे शिंदेंचा मेळावा आता बीकेसी मौदानावर होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पण, या पोस्टरमधून शिंदे गटानं धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरेंवर आपला हक्क असल्याचं दाखवून दिलंय. यासोबतच त्यांनी ५ ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण हे बीकेसी मैदान, मुंबई असं म्हटलंय. त्यामुळे शिवतीर्थावरील ठाकरे आणि शिंदे गटातला संघर्ष टळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

एकनाथ शिंदे गटानं लावलेल्या पोस्टरमध्ये बाळासाहेबांचा फोटो, भगवा झेंडा लावून त्यावर ‘आम्ही विचारांचे वारसदार’, ‘हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार’ अशा आशयाचा मजकूर छापण्यात आलाय. तसेच या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आलाय. त्यावर बाळासाहेब तुमचा वाघ आहे, म्हणून हिंदुत्वाला जाग आहे, असं म्हटलं गेलंय.

हेही वाचा: Sharad Pawar : एक दौरा अन् सत्तेत पुन्हा...; सुप्रिया सुळेंच्या विधानानं भुवया उंचावल्या

तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई शहरात लावलेल्या पोस्टरवर ‘काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे’ असंही नमूद करण्यात आलंय. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं? हा प्रश्न सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आणि त्याचं उत्तर अजूनतरी आलेलं नाही. तरी, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरवर धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलंय. त्यामुळे शिंदे गटानं पोस्टरमधून शिवसेनेला डिवचल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलीए. आता दसरा मेळाव्यालाच शिंदे आणि ठाकरेंची तोफ किती शक्तिशाली अवतारात धडाडणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय हे नक्की.