esakal | लवकरच राज्यात कॉंग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार? शिवसेनाही अनुकूल!
sakal

बोलून बातमी शोधा

लवकरच राज्यात कॉंग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार? शिवसेनाही अनुकूल!

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास रिक्त होणारे पद शिवसेनेला सोपवण्याची तयारी कॉंग्रेसने दाखवली आहे.

लवकरच राज्यात कॉंग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार? शिवसेनाही अनुकूल!

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास रिक्त होणारे पद शिवसेनेला सोपवण्याची तयारी कॉंग्रेसने दाखवली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी कॉंग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आला असल्याचे समजते. त्यानुसार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवे उपमुख्यमंत्री होतील. विधानसभा अध्यक्षासारखे महत्त्वाचे पद मिळणार असल्याने शिवसेना या प्रस्तावाला अनुकूल आहे. मात्र, कोणताही विशेष अधिकार नसलेले उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून अध्यक्षासारख्या महत्त्वाच्या पदावर तुळशीपत्र ठेवण्यास कॉंग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांचा विरोध आहे. 

भाजपने कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही आमदारहरणाचे प्रयत्न केल्यास पक्षांतरबंदीचे सर्व कायदे राबवणारे अध्यक्षपद शिवसेनेकडे स्वत:हून सोपवणे योग्य नसल्याचे कॉंग्रेसमधील काही ज्येष्ठांचे मत आहे. शिवसेनेने मात्र या प्रस्तावावर चर्चा करायला हरकत नाही, अशी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने अध्यक्षपद आमच्याकडे येत असेल तर ते चांगलेच नाही का, अशी टिप्पणी जोडत तशी वेळ आल्यास महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्तीशी संबंधित काही किंतु-परंतुमध्ये अध्यक्षपद हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे कॉंग्रेसच्या एका कार्यकारी अध्यक्षाने मान्य केले. विद्यमान अध्यक्षांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण, के. सी. पडवी, यशोमती ठाकूर आदींच्या नावांची चर्चा आहे. अध्यक्षपद सोडायचे नाही, असे ठरल्यास अशोक चव्हाण किंवा नितीन राऊत यांच्याशी पटोले यांच्या जबाबदारीची अदलाबदल होऊ शकते. पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळेन; पण मंत्रिपदही हवे असल्याची अट घातल्याचेही बोलले जात असल्याने हा पदबदलाचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. 
आज कॉंग्रेसचे काही महत्त्वाचे नेते दिल्लीत पोहोचले असून पक्षनेते राहुल गांधी यांनी मान्यता देताच पटोले यांच्या नावाची घोषणा कुठल्याही क्षणी होईल, असे सांगण्यात येत होते. नवा अध्यक्ष नेमतानाच पाच कार्याध्यक्षांची नावेही घोषित होऊ शकतात. हुसेन दलवाई, प्रा. वसंत पुरके, कुणाल पाटील, प्रणीती शिंदे आणि कैलास गोरंट्याल ही पाच नावे या पदासाठी जवळपास निश्‍चित झाली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

राष्ट्रवादी शांत 
नव्या समीकरणांनुसार विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसऐवजी शिवसेनेकडे गेले तर महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला ते मान्य होईल काय, याचा अंदाजही शिवसेना आणि कॉंग्रेसतर्फे घेतला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे.

--------------------------------------------

maharashtra politics latest marathi news Congress Deputy Chief Minister in the state mahavikas aghadi updates

loading image