Eknath Shinde बंड : 'योग्य मार्गाने पैसे कमावले नसल्याने ईडीची भीती

महाराष्ट्रातील अस्थिर राजकारणावर भविष्यातील अंदाजाचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढतच असून सत्तासंघर्ष...
Maharashtra Politics Shiv sena Uddhav Thackeray and Eknath Shinde Hardas ED fear of not making money right way mumbai
Maharashtra Politics Shiv sena Uddhav Thackeray and Eknath Shinde Hardas ED fear of not making money right way mumbaisakal

महाराष्ट्रातील अस्थिर राजकारणावर भविष्यातील अंदाजाचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढतच असून सत्तासंघर्ष...शिवसेना कोणाची...पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे कार्य...अशा द्विधा मनस्थितीत शिवसैनिक अडकले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले कल्याणमध्ये शिवसेना रुजविण्यात ज्यांचा मोठा हातभार होता असे कल्याणचे कट्टर ज्येष्ठ शिवसैनिक काका हरदास यांनी व्यक्त केलेले मनोगत...

कल्याण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळेच नाते आहे. बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा आरंभकाळ होता, तेव्हा ते फक्त बाळ ठाकरे होते. त्यांच्या हाती असलेल्या मार्मिक या अस्त्रातून त्यांनी मराठी मनाला हात घातला. अमराठी लोकांचे मुंबईवरील आक्रमण हा त्यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू होता, हे आवाहन युवकांना भावले व शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेची लाट ठाणे व कल्याण येथे पोहोचली ती ठाण्यात दिवंगत आनंद दिघे व कल्याणात काका हरदास यांच्या प्रयत्नातून. काकांनी शिवसेना कल्याणात रुजवली. काका कल्याण नगरपालिका ते महानगरपालिका या प्रवासात प्रमुख केंद्र होते. समाजकारण पक्षीय सीमांच्या बाहेर असते हे जाणल्याने ते पुढे सक्रीय राजकारणापासून दूर झाले.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर अटी घातल्या आहेत. उद्धव यांनी त्या मान्य केलेल्या नाहीत. शिंदे अजूनही अडून बसले असून पुढे काय होणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. याविषयी काका म्हणाले, आत्ता जे राजकारण सुरु आहे, माझ्या दृष्टीने त्याला काहीही महत्त्व नाही. बाळासाहेबांच्या वेळेसची शिवसेना व आत्ताची शिवसेना यामध्ये तुलना करता येणार नाही. बदल हा शाश्वत असतो, त्यानुसार आता सारे काही बदलले आहे. पूर्वी पक्षात पद नव्हती जास्त, जसजसी सत्ता येत गेली तसे पदही वाढली आणि त्यासोबत पैसाही आला. गेल्या अडीच वर्षापासून जे राजकारण सुरु झाले आहे, ते अत्यंत खालच्या पातळीवर गेलेले आहे. भाजपने केंद्रीय यंत्रणेचा उपयोग करुन विरोधी पक्षाला जास्तीत जास्त कसे अडचणीत आणता येईल त्याकरीता प्रयत्न केलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहे. त्यातूनच हे उदभवलेले आहे असे मला वाटते. कोणी पैसेवाला होऊ नये असे माझे म्हणने नाही. प्रत्येकाने मोठे व्हावे परंतू पैसे कमवताना ते योग्य मार्गाने कमवले तर आपल्याला काही भिती नसते परंतू योग्य मार्गाने कमवले नसल्याने हा प्रकार उद्भवला आहे. यामध्ये ईडीची भिती जास्त आहे असे मला वाटते.

राजकारणामध्ये काहीही घडू शकते, आपण वेट अण्ड वॉचच्या भूमिकेत रहायला हवे. बंडखोरी केलेल्या गटाकडे दोन तृतीयांश बहुमत आहे, म्हणजे तो स्वतंत्र गट म्हणून बसू शकतो. 1964 सालपासून संघ जेव्हा होता तेव्हापासून मी भाजपचे काम पहात आलो आहे. त्यांची व्यूव्हरचना जी आहे, ती उच्च दर्जाची आहे. ते शिंदेंना पक्षात विलीन होण्याची अट घालतील. नारायण राणे यांच्यासारखीच खेळी शिंदेंसोबत खेळली जाईल. मग तो मोठा पेच शिंदे यांच्यासमोर उभा राहू शकतो. येत्या दोन तीन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल. भाजपची ही भूमिका चुकीची नाही, कारण पक्ष वाढीसाठी त्यांचे ते मत आहे त्यामुळे आपण त्याला चुकीचे बोलू शकत नाही. जर असे झाले तर शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल, नाही झाले तर ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जोपर्यंत काही निर्णय होत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, परंतू शिंदे यांचे कार्य देखील नाकारता येणार नाही. परंतू त्यांनी अशा प्रकारे पाऊल उचलायला नको होते. त्यांनी विचार करुन पुन्हा शिवसेनेशी नाळ जुळवावी असे वाटते. मुख्यमंत्र्यांना पदाची कोणतीही लालला नाही, शरद पवारांच्या आग्रहामुळे ते मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री पद तसेच शिवसेना प्रमुख पद सोडायला तयार आहे असे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बंडखोरांना एक चपराक मारली आहे. अर्थात शिवसेना प्रमुख पद सोडायची त्यांना जरुरी नाही. मुख्यमंत्री पद सोडून ते बाजूला होत असतील तर शिवसैनिकांचे म्हणने नाही. परंतू येणाऱा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा शिवसैनिक असला पाहीजे ही शिवसैनिकांची भावना आहे. परंतू असे जर होणार नसेल आणि ते भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पद घेणार असतील तर कोणताही कट्टर शिवसैनिक ते मान्य करणार नाही. कारण भाजपने गेल्या पाच वर्षात तसेच गेल्या अडीच वर्षात शिवसेनेला ऐवढा त्रास दिला आहे की कोणताही शिवसैनिक हे मान्य करणार नाही.

आत्ताचे जे राजकारण सुरु आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदे हे संपूर्णपणे उघडे पडले आहेत. ते म्हणतात मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मात्र ते तसे असते तर त्यांनी बंडखोरी केली नसती. उद्धव यांच्याशी चर्चा केली असती, त्यांचे विचार त्यांना पटले नसते आणि मग ते बाहेर पडले असते तर कोणाला काही हरकत नसती.

सत्ता असो वा नसो शिवसैनिकांना काही फरक पडणार नाही. कारण 1966 ला शिवसेना स्थापन झाली. त्यानंतर वामनराव महाडिक आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1990 साली शिवसेनेचे जास्त आमदार आले. 1995 साली शिवसेनेच्या हातात सत्ता आली. गेल्या निवडणूकीत भाजपने शिवसेनेला जो शब्द दिला होता, तो त्यांनी नाकारला. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करणे भाग पडले. आघाडी झाल्यानंतर भाजपला त्याच वाईट वाटण्याचे कारण नाही. सत्ता येते आणि जाते, सत्ता गेली म्हणून एवढी तडफड तर कॉंग्रेसने देखील केली नाही, त्यांनी तर 76 वर्षे सत्ता राबविली आहे. यादृष्टीने विचार केला तर अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे असे वाटते. कोणतीही चर्चा न करता बंडखोरी करायची त्यातही गुजरातला जायचे तेथून पुन्हा गुवाहाटीला जायचे हे प्रकार अत्यंत निंदनीय आहेत असे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com