esakal | विद्यार्थ्यांना पुस्तकरूपी वसा देणारे महावीर बुक झाले निवृत्त
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

विद्यार्थ्यांना पुस्तकरूपी वसा देणारे महावीर बुक झाले निवृत्त

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याच्या ध्येय्याने समर्पित होत डोंबिवलीतील रत्नाकर जैन या हॉटेल व्यावसायिकाने 35 वर्षांपूर्वी पश्चिमेत हॉटेल बंद करीत महावीर बुक डेपो सूरु केला. अत्यंत कमी दरात म्हणजेच 5 टक्के किंमतीत विद्यार्थ्यांना वर्षभर ते पुस्तके पुरवीत. आज कित्येक पिढ्या त्यांच्या या सहकार्याने उच्च शिक्षण घेऊ शकल्या. मात्र सोमवारी महावीर डेपोने निवृत्ती घेतली. डोंबिवलीतील विद्यार्थी वर्ग, पालक यामुळे हळहळला आहे.

डोंबिवली पश्चिमेत राहणारे रत्नाकर जैन (वय65) हे पूर्वी हॉटेल चालवीत होते. हॉटेल समोरच महाविद्यालय असल्याने तेथील विद्यार्थी हॉटेलमध्ये चहा, नाश्त्यासाठी येत तेव्हापासूनच जैन यांची विद्यार्थ्यांशी एक नाळ जणू जोडली गेली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने, त्या वेळेला पैसे जवळ नसल्याने अनेक विद्यार्थी पुस्तके घेऊ शकत नसत. त्यांच्या शिक्षणात येणारे अडथळे पाहता, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे या भावनेतून जैन यांनी हॉटेल बंद करून महावीर बुक डेपो 1987 साली शास्त्रीनगर रोडवर सुरू केले.

रत्नाकर सांगतात सुरुवातीची पहिले 3 वर्षे 1 ली ते 10 वि ची पुस्तके दुकानात ठेवली. त्यासोबतच अभियांत्रिकी व महाविद्यालयीन पुस्तके देखील होती. 10 वी ची पुस्तके घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पत्ता, फोन नंबर मी घेत असे. परीक्षेच्या वेळेस त्यांना भेटकार्ड, पेन, पेन्सिल असे साहित्य घरी भेट म्हणून पाठवीत असे. यामुळे माझे विद्यार्थ्यांसोबत एक वेगळे नाते तयार झाले. पुढे हे विद्यार्थी महाविद्यालयीन पुस्तके, अभियांत्रिकीची पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे येऊ लागले.

अभियांत्रिकी, विविध विषयांत डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी 10 टक्के डिस्काउंटवर पुस्तके देत असे. वर्षभरानंतर त्यांनी पुस्तक परत केल्यावर 60 ते 70 टक्के त्यांना पैसे परत करत असे. असे केवळ किंमतीच्या 5 टक्के रक्कमेत वर्षभर पुस्तक वापरावयास मिळाल्याने खूप सारे विद्यार्थी मला जोडले गेले. विद्यार्थी त्यांची मुले अशा दोन पिढ्या आमच्या दुकानाशी जोडल्या गेल्या. कुठे पुस्तक मिळाले नाही तरी महावीर मध्ये नक्की भेटणार या आशेने विद्यार्थी येत असत, आणि त्यांना ते पुस्तक उपलब्ध करून देणे मी माझे कर्तव्य समजत होतो.

हेही वाचा: 'महिला राज' असलेल्या स्थानकात होणार वाढ

विद्यार्थी शिकले पाहिजेत, त्यांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे हाच या मागचा एकमात्र उद्देश असल्याचे रत्नाकर सांगतात. विद्यार्थ्यांना पुस्तके मिळवीत यासाठी सुरवातीचे 26 वर्षे मी कधी दुकानही बंद ठेवले नाही. नंतरमात्र सोमवारी दुकान बंद ठेवायला लागलो. आता मला निवृत्त व्हायचे म्हणून सोमवारी मी दुकान बंद केले. दुकानातील सर्व पुस्तके मी विकली आहेत.

विद्यार्थ्यांना दुकान बंद झाल्याचे समजल्या पासून मला फोन येत आहेत काही आर्थिक अडचण असल्यास आम्ही मदत करतो असेही सांगतात. पण अडचण नाही तर मला निवृत्त व्हायचे असल्याने मी हा निर्णय घेतला.

रत्नाकर जैन, महावीर बुक डेपो मालक

loading image
go to top