इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडवा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडवणे महत्त्वाचे आहे. पोलादपूर तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

पोलादपूर : गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडवणे महत्त्वाचे आहे. पोलादपूर तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

सोमवारी (ता. 17) पोलादपूर तालुक्‍यातील उमरठ येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता पारधी, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी विभागाच्या शेतकरी योजनेच्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. 

मुख्यमंत्री म्हणाले, की आजचा दिवस पवित्र दिवस आहे. थोर पुरुषांचे महत्त्व माहिती असणे आवश्‍यक आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन आवश्‍यक आहे. गडकिल्ल्यांचे रक्षण शिवरायांनी केले ते आपले खरे वैभव आहे. शिवनेरीहून माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो आणि एक वर्षाच्या आत रामजन्मभूमीचा विषय पुढे आला. शिवनेरीच्या मातीमुळे मला मुख्यमंत्री पद मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हटले की चैतन्य येते. शासनाचे धोरण हे पर्यटन विकासाचे आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. 

ही बातमी वाचा ः हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी गोड बातमी; स्थानकांवर लवकरच मिळणार हि सुविधा
तालुक्‍यातील गड-किल्ल्यांसाठी 30 कोटी द्या 
पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, पोलादपूर तालुका हा दुर्गम तालुका आहे; मात्र तो डोंगराळ म्हणून घोषित व्हावा. सध्या या परिसराला "क' वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त आहे. तो "ब' वर्ग केला जाईल. वाढते पर्यटक लक्षात घेता, या ठिकाणी लवकरच बचत भवन उभे केले जाईल. पाच कोटी रुपये खर्चातून पोलादपूर तालुका क्रीडा संकुल उभे केले जाईल. आमदार भरत गोगावले यांनी उमरठ येथील पर्यटनस्थळांसह नरवीर सूर्याजी मालुसरे यांची समाधी, तालुक्‍यातील गड-किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी 30 कोटी रुपये निधी शासनाने द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच मढे घाटचा मार्ग पुण्याला जोडण्यात यावा तसेच त्या मार्गाला नरवीर तानाजी मालुसरे यांचे नाव देण्याची मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make history more than just being involved in history; Chief Minister Uddhav Thackeray