कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करा; वाचा कोणी केलीय आहे ही मागणी

कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करा; वाचा कोणी केलीय आहे ही मागणी

मुंबई - आज घडीला कोरोना विषाणूने बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याचवेळेस आवश्यक अँटीव्हायरल औषधांचा कमालीचा तुटवडा आहे, या दोन्ही गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र सरकारने रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढवला पाहिजे.

प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेबाबत महाराष्ट्रातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कसून चाचणी करण्यात आली होती. कोरोनाच्या ज्या रूग्णांमध्ये प्राणवायूची कमतरता भासल्यामुळे ज्यांना ऑक्सिजन आणि आयसीयूत दाखल करावे लागते अशा रुग्णांना प्लाझ्मा थेरपी जीवनरक्षक उपाय म्हणून प्रभावी ठरलेले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विविध हॉस्पिटल्समध्ये याचा पुरेसा वापर केला जात नाही. प्लाझ्मा दाते पुरेशा संख्येत उपलब्ध नसल्यामुळे हे घडते असे सांगितले जात आहे. विविध वृत्तसंस्थांनी प्रसिध्द केलेल्या बातम्यांनुसार कोरोनाच्या आजारात सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम मागत आहेत. 

या सर्व बाबींचा विचार करता, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्यातर्फे आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की या प्राणघातक आजारामधून सरकारी आणि खाजगी उपचार घेऊन बऱ्या झालेल्या सर्व रुग्णांना प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करणे बंधनकारक करावे.

स्वतंत्र प्लाझ्मा बँक तयार करावी - 
ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, सर्व रुग्णांकडून आजारातून बरे झाल्यावर 15 व्या दिवशी त्यांना पुनर्तपासणीसाठी बोलावण्यात यावे. त्यावेळेस त्यांची सर्वसाधारण तपासणी करून ते तंदुरुस्त असल्यास त्यांना प्लाझ्मासाठी रक्तदान करण्यास तयार करावे. अशा दात्यांच्या रक्तसंकलनासाठी सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील रक्तपेढीच्या मदतीने प्रत्येक महत्वाच्या गावात किंवा शहरात स्वतंत्र प्लाझ्मा बँक तयार करावी.

'महामारी कायदा 1897 मधील तरतुदीनुसार किंवा यासाठी एक नवीन अध्यादेश काढून त्यातील तरतुदीनुसार सरकार प्लाझ्मा संकलनासाठी रक्तदानाची प्रक्रिया अनिवार्य करू शकते. या पद्धतीने प्लाझ्माची उपलब्धता आणि रुग्णांसाठी त्याचा वापर वाढवला गेला तर त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांच्या आजारातून मुक्त होण्याचा दर तर वाढेलच पण राज्यातील मृत्युदरही आटोक्यात आणता येईल असा विश्वास आयएमए महाराष्ट्र राज्याने व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्रातील नागरिकांना एक कळकळीचे आवाहन करतो की सरकारने प्लाझ्मासाठी रक्तदान करण्याची सक्ती केल्यास, त्याकडे लोकशाहीची मूल्यांना धक्का पोहोचवणारी घटना असा विचार करू नये, तर मानवतेप्रती आपले कर्तव्य आणि मानवी जीव वाचवण्याची वचनबद्धता म्हणून पाहिले जावे. त्यातून सर्वांना फायदा होईल. 

डाॅ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com