लव्ह जिहाद विरोधी कायदा करा; मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेण्याचे भाजपचे आवाहन

कृष्ण जोशी
Saturday, 21 November 2020

लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा व यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.  

मुंबई ः शिवसेनेचे हिंदुत्व आजही अबाधित आहे अशी आशा आहे, पण हिंदुत्वावर संकट ओढवले असताना आपण स्वस्थ कसे बसू शकता, असे सुनावत लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा व यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.  

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेची शानदार कामगिरी; 35.53 दशलक्ष टन मालाची केली वाहतूक 

राज्यातील लेकी बाळींचे, माता भगिनींचे रक्षण करण्यासाठी असा कायदा आवश्यक आहे. देशातील अनेक राज्यात कठोर शिक्षेची तरतूद असणारा असा कायदा करण्यात आला आहे, असेही विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी दाखवून दिले आहे. 

माता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या वीरांगनांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. लव्ह जिहाद हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे. अनेक राज्यांनी याप्रकरणी कठोर धर्म स्वातंत्र्य कायदा लागू केला आहे. मध्यप्रदेश सरकारने असा आंतरधर्मीय विवाहासंबंधी कायदा लागू करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार दोषींना पाच वर्षांची शिक्षा दिली जाईल. उत्तर प्रदेश, हरियाणा व पंजाब सरकारने देखील अशाचप्रकारचा कायदा आणण्याची घोषणा केली आहे, असेही लाड यांनी दाखवून दिले आहे. 

त्यानुसार आपणही महाराष्ट्रात असाच कठोर कायदा लागू करून लव्ह जिहाद सारख्या धर्मसंकटातून राज्यातील लेकीबाळींचे रक्षण करावे. काही षडयंत्री लोकांकडून स्वतःची खरी ओळख लपवून लेकीबाळींची फसवणूक करून लव्ह जिहाद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे षडयंत्री लोक प्रेमाचा बनाव करून फक्त धर्मांतरासाठी हिंदूधर्मीय तरुणींना फसवून, फूस लावून त्यांच्याशी विवाह करीत आहेत. या मुलींचा शारिरिक, मानसिक व लैंगिक छळही करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मुद्यावर राजकीय चर्चा सुरु आहे, मात्र अजूनही याबाबत राज्य सरकारकडून ठोस पावले टाकली जात नाहीत, असेही लाड यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा - अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत; पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी अडचणी 

साक्षात माँसाहेबांचा पुत्र मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आपण लव्ह जिहाद सारख्या गंभीर विषयाकडे स्वतः लक्ष देऊन दोषींना कठोर शासन करण्यासाठी असा कायदा लागू करावा. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याबाबत आपण तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी आणि हिंदू माता भगिनींवर येणारे धर्मसंकट दूर करावे, असेही आवाहन लाड यांनी केले आहे.

Make Love Jihad Anti-Law BJP appeals to CM to act on 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make Love Jihad Anti-Law BJP appeals to CM to act on it