मलिक यांचा जावई व मुख्य आरोपीमध्ये आर्थिक व्यवहार - एनसीबी

अनिश पाटील
Thursday, 14 January 2021

सजनानीचे युपीमध्ये गांजाचे हर्बल प्रोडक्ट बनावण्याचे युनीट, एनसीबीची शोध मोहिम

मुंबई, ता.14 : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान याचे मुख्य आरोपी व ब्रीटीश नागरीक करन सजनानीसोबत समाज माध्यमांवरील काही चॅटही NCB च्या हाती लागले आहेत. त्यानुसार, खानच्या आर्थिक मदतीने सजनानी हर्बल प्रोडक्टच्या नावाखाली गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे एनसीबीने गुरूवारी न्यायालयाला सांगितले. उत्तर प्रदेशात सजनानी याने गांजाची पॅकेजींग करून त्याला हर्बल प्रोडक्ट दाखवण्याचे युनिट उभारले होते, त्याबाबत एनसीबी अधिक तपास करत आहे. खानच्या वकिलांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करन सजनानी याच्या सोबत समीर खान याचे ड्रग्ज कनेक्शन असल्याचे एनसीबीच्या निदर्शनास आले. दोन दिवसांपूर्वी करन साजनानी याला वांद्रे येथून अटक करण्यात आली होती. करन सजनानीकडे 200 किलोचा गांजा एनसीबीने जप्त केला. या गांजाला हर्बल प्रोडक्ट दाखवण्यासाठी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे एक युनीट सुरू करण्यात आले होते. तेथे त्याचे पॅकेजिंग करून हर्बल प्रोडक्ट दाखवण्यात यायचे. त्यामुळे एनसीबीची उत्तर प्रदेशातील पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचबरोबर सजनानी आणि समीर व्यावसायिक संबंध होते. त्यातून खानने काही रक्कम सजनानीला दिली असून ती लाखोंमध्ये असल्याचे एनसीबीकडून न्यायालयाला सांगण्यात आले.

धनंजय मुंडे प्रकरण : "व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील", रेणू शर्माच्या वकिकांचा खळबळजनक दावा

या आर्थिक व्यवहारामुळे एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावला होता. त्यानुसार समीर खान बुधवारी एनसीबीच्या चौकशीसाठी हजर झाले. काही तासांच्या  चौकशीनंतर एनसीबीने समीर खान यांना अटक केली. त्याला याप्रकरणी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळपासुनच एनसीबीने समीर खानच्या राहत्या घरामध्ये शोधमोहिम राबवली. याशिवाय सजनानीसोबत व्हॉट्सअॅप चॅटही एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्याच्या सहाय्याने दोघांमध्ये आर्थिक व्यवहार असल्याचे निष्पन्न झाले आहेत. एनसीबी याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
सजनानी हा हाँगकाँगमध्ये व्यवसाय करत होता. तेथे नुकसान झाल्यानंतर भारतात परतला त्यावेळी त्याचा मित्र खान याच्यासोबत 15 महिन्यांपूर्वी त्याचे बोलणे झाले. त्यावेळीच सजनानीने हर्बल प्रोडक्टच्या नावाखाली गांजा विकण्याचे ठरवले होते. तंबाखू, सीबीडी तेल व गांजा यांचे मिश्रण करून ते हर्बल प्रोडक्ट म्हणून विकण्याचे त्याने ठरवले.

एमसीबीने काही दिवसांपूर्वी मुच्छड पानवाला याला ड्रग्ज प्रकरणी अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे नाव समोर आले. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचे पती आहेत. त्यांच्या रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. 

Maliks son in law and main accused has financial transactions NCB


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maliks son in law and main accused has financial transactions NCB