ईटीसी केंद्राचं शाळेत रूपांतर कधी करणार, आमदार मंदा म्हात्रेंचा पालिकेला प्रश्न

सुजित गायकवाड
Tuesday, 29 September 2020

राज्यभरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेले केंद्रांचे शाळेत रूपांतर करण्याचा कायदा 2018 ला  राज्य सरकारने तयार केला आहे

नवी मुंबई, ता. 29 : राज्यभरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेले केंद्रांचे शाळेत रूपांतर करण्याचा कायदा 2018 ला  राज्य सरकारने तयार केला आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिका अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे शाळेत रूपांतर कधी करणार असा सवाल भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आज उपस्थित केला. कोरोनाकाळात पालिकेने लवकरात लवकर अपंग विद्यार्थ्यांच्या थांबवलेल्या सुविधा परत सुरळीत न केल्यास तिव्र आंदोलन करू असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे. 

मार्च महिन्यापासून शहरातील पालिकेच्या ईटीसी केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहेत. वाशीच्या ईटीसी केंद्र अपंग विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आदी सर्व सुविधा बंद करून त्याजागेवर कोव्हीड केअर केंद्र तयार केले आहे. वाशी ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात ऐरोली सेक्टर 15 च्या उद्यानातील एका कार्यालयात पालिकेतर्फे अपंगांसाठी केंद्र उभारले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना येणारा निधी आणि इतर सुविधांसाठी सद्या पालक या कार्यालयात गर्दी करीत आहेत.

महत्त्वाची बातमी : भाजपवर निशाणा साधत अनिल देशमुख म्हणालेत; CBI ने आता सांगावं, सुशांतची हत्या होती की आत्महत्या

वाशीतील केंद्र बंद झाल्यामुळे शहरातील अंपंग उघड्यावर पडले आहेत. याबाबत महापालिकेमार्फत काहीच कार्यवाही होत नसल्याने मंदा म्हात्रे यांनी वाचा फोडण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत पत्रकारांना माहिती देताना म्हात्रे यांनी तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात ईटीसी केंद्रातील भ्रष्टाचार पुरावेसहीत उघडकीस आणला होता. मात्र त्यांनी एका अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी क्लिनचिट दिल्याचा आरोप केला. याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपंग केंद्रांचे रूपांतर शाळेत करण्याचे एक परिपत्रक काढले. त्यापरिपत्रकानुसार महापालिकेने केंद्राचे शाळेत रूपांतर करावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली. तसेच महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर नवीन आले आहेत. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा म्हात्रे यांनी दिला.   

अपंग विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने स्थापन केलेले शिक्षण व प्रशिक्षण केंद्र हे केंद्र नसून शाळा आहे. याकरीता आम्ही सरकारसोबत भांडत आहोत. केंद्राच्या संचालिका केंद्राच्या नावावर विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित ठेवत आहेत. आता जो नवीन कायदा झाला आहे. त्यानुसार केंद्राचे रूपांतर शाळेत करावे. असं दिव्यांग विद्यार्थी पालक कृती समिती अध्यक्ष संतोष साठे-पाटील म्हणालेत. 

( संकलन - सुमित बागुल )

manda mhatre asks question to nmmc commissioner about ETC school


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manda mhatre asks question to nmmc commissioner about ETC school