बापरे ! मुंबई भोवतालचं संरक्षक कवच नाहीसं होण्याच्या मार्गावर; भरावामुळे चौपाट्यांवर संक्रांत

बापरे ! मुंबई भोवतालचं संरक्षक कवच नाहीसं होण्याच्या मार्गावर; भरावामुळे चौपाट्यांवर संक्रांत

मुंबई, ता.17 - वरळी- वांद्रे प्रकल्पामुळे दादर, प्रभादेवी, शिवाजीपार्क, माहीम आणि वर्सोवाच्या वाळूच्या चौपाट्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जुहू ते गोराईपर्यंतच्या वाळूची मोठी धूप झाली. माहीमची खाडी आणि दादर व इतरत्र अरबी समुद्र प्रदूषित झालाय. 26 जुलैला मुंबईला पुराचा सामना करावा लागला. आता कोस्टस रोड प्रकल्पाच्या भरावामुळे उरलेल्या चौपाट्यांवर संक्रांत येणार असून खरापूटीचा पट्टा ही नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे.  

मुंबई पालिकेच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड म्हणजेच सागरी मार्ग प्रकल्पाचं काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी समुद्रात आणखी भराव टाकावा लागणार आहे. परवानगीसाठी पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका ही दाखल केली. आता 35.5 किमी लांबीच्या सागरी रस्त्याच्या भरावामुळे गिरगाव ते मनोरी, गोराईपर्यंत मुंबईच्या सर्व वाळूच्या किनाऱ्यांची धूप होणार व ते उध्वस्त होणार असल्याची भिती भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक ऍडव्होकेट गिरीष राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

कोस्टल रोडच्या भरावामुळे उपनगरातील किमान साडेपाच किलोमीटर लांबीचा मॅन्ग्रूव्हचा पट्टा गाडला जाणार आहे. मॅन्ग्रूव्हचा ही पृथ्वीवरील सर्वाधिक जैवविविधता व उत्पादकता धारण करणारी अद्भुत परिसंस्था आहे. ती मासळीची प्रसुतीगृहे आहेत. त्यांच्या नाशाबरोबर मासळी दुष्काळ वाढत आहे, पुढे तो आणखी वाढणार असल्याची चिंता ही त्यांनी व्यक्त केली. मुंबईसाठी मॅन्ग्रूव्ह जंगल हे वादळे, महापूर व त्सुनामीपासुन वाचवणारे संरक्षक कवच तसेच हवेतील आणि समुद्रातील प्रदूषण निवारण करणारी जैविक गाळणी, फुफ्फुस, प्रक्रिया केंद्र असून हे वैभव टिकवणे सर्वांची जबाबदारी असल्याचे ही ते म्हणाले. 

भरावामुळे खाड्यांची घुसळण थांबल्याने मुंबईचा पूर्ण समुद्र प्रदूषित होणार आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांतून समुद्राचे पाणी आत शिरत असल्याने अतिवृष्टी किंवा चक्रीवादळ आल्यास मुंबईत 26 जुलै पेक्षा भयंकर परिस्थिती ओढवण्याची शक्यता असून त्यात लाखो माणसांचे बळी जाण्याची भिती ही राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईतील समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. मोटार, वीज आणि सीमेंटचा बेसुमार  वापर यासाठी कारणीभूत असल्याचे राऊत यांना वाटते. यावर आळा घालण्याऐवजी सरकारने सागरी रस्त्यासारखे प्रकल्प रेटल्याने आपण अधिक वेगाने विनाशाकडे जात आहोत. या प्रकल्पांनी निसर्ग व वातावरणाचा नाश होतोय. वायुप्रदुषण वाढतय, त्यामुळेच कोरोना, एडस, कँसर, एबोलासारख्ये आजार परसत असल्याचे ही ते म्हणाले. 

मुंबईतील जागृक पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पास 2015 पासुन लेखी पत्र लिहून विरोध केला. त्यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले गेले नाही. याची कायद्याने आवश्यक असलेली सार्वजनिक सुनावणी झालेली नाही. तरी मेट्रो 3 भूयारी रेल्वे प्रमाणेच खोट्या प्रचारावर हा हानिकारक प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप ही राऊत यांनी केला. जनतेने  सरकार व महापालिकेकडे पत्रे लिहून वा इतर पध्दतीने या प्रकल्पाला विरोध व्यक्त करावा असे आवाहन ही त्यांनी शेवटी केले.

परांजपे समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष : 

26 मे 1987 च्या, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सचिव के. जी. परांजपे समितीच्या अहवालापासुन सर्व वाहतुक व सागरी पर्यावरणाच्या अहवालांनी मुंबईच्या समुद्र व खड्यांत भराव करू नये व सागरी रस्ता किंवा भूयारी रेल्वे करू नये असे बजावले आहे. तरी भराव व प्रकल्प करून विनाशाकडे वाटचाल  होत आहे. सरकारने सागरी रस्ता प्रकल्पाचे काम थांबवावे व मुंबई वाचवण्यासाठी तो रद्द करावा असे पर्यावरण तज्ज्ञाना वाटते.

( संकलन - सुमित बागुल ) 

mangroves around mumbai are on the verge of getting vanish due to massive new construction

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com