विनावाहक बसमुळे फुकट्यांची सोय!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बेस्ट उपक्रमाला दररोज मोठा आर्थिक फटका 

मुंबई : बेस्ट उपक्रमाने काही दिवसांपासून सुरू केलेल्या विनावाहक बससेवेच्या ढिसाळ कारभारामुळे फुकट्यांची चांगलीच सोय होत आहे. परिणामी आधीच डबघाईला आलेल्या बेस्टला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यावरून गुरुवारी (ता. 13) बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वच पक्षांनी बेस्ट प्रशासनाला धारेवर धरले.

हेही वाचा - टीएमटीच्या बस भाडेवाढीच्या दिशेने

बेस्ट प्रशासनाने खर्च कमी करण्याच्या उद्देशाने विनावाहक बससेवा सुरू केली आहे. त्यामध्ये बेस्ट उपक्रम आणि भाडेतत्त्वावरील बसगाड्या चालवण्यात येत आहेत. भाडेतत्त्वावरील एकच दरवाजा असलेल्या बस ठराविक थांब्यांवर थेट प्रवासी वाहतूक करत आहेत. या विनावाहक बसमधील आसने रिकामी असतानाही अनेकदा प्रवाशांना चढू दिले जात नाही. त्यामुळे क्षमतेपेक्षा कमी प्रवासी घेतल्याने उपक्रमाचे नुकसान होते. त्याचप्रमाणे थांब्यांवर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. बेस्टच्या बसगाड्यांना दोन दरवाजे असल्यामुळे अनेक प्रवासी तिकीट न काढताच उतरून जातात. 

हेही वाचा - पश्चिम महाराष्ट्राच्या उसाला रायगड जिल्ह्याचा आधार

या पार्श्‍वभूमीवर बेस्ट प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना करून नुकसान टाळावे, अशी मागणी शिवसेनेचे अनिल कोकीळ यांनी केली. विनावाहक बस उपक्रमामुळे काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना कामच शिल्लक राहत नसल्याने त्यांना मुंबई सेंट्रल, कुलाबा आगारासारख्या ठिकाणी "ग्राऊंड बुकिंग' करण्याचे काम दिले जात असल्याचेही कोकीळ यांनी सांगितले. नुकसान टाळायचे असल्यास फक्त भाडेतत्त्वावरील बसमध्येच हा उपक्रम राबवावा किंवा बस चालकाकडे संपूर्ण नियंत्रण द्यावे, अशी मागणी भाजपचे सुनील गणाचार्य यांनी केली. श्रीकांत कवठणकर यांनीही या उपक्रमात सुधारणा करण्याची मागणी केली. 

 

उत्पन्नाचा अहवाल द्या 
विनावाहक बससेवा योजना सुरू झाल्यापासून संबंधित मार्गांवरील उत्पन्नाचा अहवाल सादर करावा, असे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी प्रशासनाला दिले. या उपक्रमात सुधारणा केली जाईल, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मुंबईकरांनी बेस्ट उपक्रमाशी ई-मेल आयडी आणि ट्विटरवर संपर्क साधावा. प्रवाशांना आवश्‍यक असणाऱ्या ठिकाणी बस मार्ग सुरू करू. 
- सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many travelers leave without getting a ticket in BEST