Sulochana Chavan : लावणीचे लावण्य मनामनात पोहचवणारी सूरसम्राज्ञी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi lavani singer sulochana chavan pass away cm eknath shinde Condolences mumbai

Sulochana Chavan : लावणीचे लावण्य मनामनात पोहचवणारी सूरसम्राज्ञी

मुंबई : ‘‘मराठी लोककलेचे लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे. त्यांना आवाजाचे वरदानच मिळाले होते. या आवाजाची ताकद ओळखून त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कलासाधनेतून अनेक गाणी अजरामर केली. मराठी लोककलेचे वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जिवंत केली. त्यामुळंच तमाशा फडातील ही लावणी घराघरात आणि मनामनापर्यंत पोहचली.

लावणीची अनभिषिक्त सम्राज्ञी

सुलोचना चव्हाण यांचे बालपण मुंबईतील एका छोट्याशा चाळीत गेले. त्यांची आई फुलविक्रीचा व्यवसाय करत असत. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली ‘सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची’ ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत; परंतु मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. त्यामुळे त्यांनी अनेकदा आईचा ओरडाही खाल्ला होता. सुलोचनाबाईंनी कधीच कोणत्याही प्रकारच्या संगीताचे प्रशिक्षण घेतले नाही. घरचा रेडिओ आणि ग्रामोफोनवरून जे कानावर पडत गेले ते तन्मयतेने ऐकून त्या रियाज करत. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच सुलोचनाबाईंनी आपल्या गायनाच्या प्रवासास सुरुवात केली.

मुंबईत त्या वेळी अनेक मेळे होत असत. ‘श्रीकृष्ण बाळमेळा’ या त्यांच्या घरच्याच मेळ्यात अभिनेत्री संध्या यांना साथ देत सुलोचनाबाईंनी प्रथम काम केले. यातूनच त्यांच्या कलाक्षेत्रातील कामगिरीस योग्य ते वळण मिळाले. मेळ्यांबरोबरच हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकांमध्येही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. त्यांची मोठी बहीण कलाक्षेत्रात नसूनही सुलोचनाबाईंना मोठा पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असे. १९४६-४७ मध्ये ‘कृष्ण सुदामा’ या हिंदी चित्रपटात संगीत दिग्दर्शक श्यामबाबू भट्टाचार्य पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सुलोचना चव्हाणांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. अवघ्या नऊ वर्षांच्या असताना त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी सुलोचनाबाई फ्रॉकमध्ये गेल्या असल्याच्या आठवणी त्यांनी अनेकदा सांगितल्या आहेत. मास्टर भगवान यांच्याही चित्रपटांमध्ये सुलोचनाबाईंना पार्श्वगायनाची संधी लाभली.

बेगम अख्तर यांची दाद

सुलोचनाबाईंच्या नैसर्गिक गायनशैलीमुळे सी. रामचंद्र, मुश्ताक हुसेन, ज्ञानदत्त, एस. के. पाल, पी. रमाकांत, निसार बझ्मी असे अनेक लोकप्रिय संगीतकार प्रभावित झाले. पार्श्वगायनासाठी मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या आणि सुप्रसिद्ध गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या ‘भोजपुरी रामायण’ गायल्या होत्या. मराठीव्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमीळ, पंजाबी या भाषांमध्ये भजन, गझल असे विविध प्रकार गात तेथेही त्यांनी आपल्या गायनाचा ठसा उमटवला. सुलोचनाबाईंचे गायन क्षेत्रात कोणतेही प्रशिक्षण झालेले नाही, हे ऐकून बेगम अख्तर यांनी त्यांची गळाभेट घेऊन त्यांना दाद दिली होती.

आचार्य अत्रेंकडून सन्मान

सुलोचना चव्हाण यांनी त्यांची पहिली लावणी आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांची ‘मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी...’ ही होती. या एका गाण्याने सुलोचना चव्हाण यांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण मिळाले. ‘सवाल माझा ऐका’ चा रौप्यमहोत्सव आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या आर्यन टॉकीजमध्ये १० एप्रिल १९६५ रोजी थाटामाटात साजरा झाला. त्या वेळी आचार्य अत्रे यांनीच त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ असा किताब दिला.

पतीकडून धडे

सुलोचनाबाईंच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीस १९५५ मध्ये एक वेगळे वळण मिळाले. श्यामराव चव्हाण यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कलगीतुरा’ या चित्रपटासाठी सुलोचनाबाईंनी काही लावण्या गायल्या. पार्श्वगायन केलेला हा त्यांचा दुसरा मराठी चित्रपट ठरला. याच चित्रपटातील सुलोचनाबाईंचा लावणीमधला गावरान बाज प्रेक्षकांना अतिशय भावला. त्यानंतरच त्यांना लावणी गायिका म्हणून प्रसिद्धी मिळाली. दिग्दर्शक श्यामराव चव्हाण यांच्याशी लग्न करून सुलोचना कदम या पुढे सुलोचना चव्हाण झाल्या. श्यामराव चव्हाण यांनी सुलोचनाबाईंना प्रभावशाली गायनाचे धडे दिले. दिनकरराव अमेंबल यांनी त्यांचा आवाज रेडिओद्वारे घराघरांत पोहोचवला. पती निधनानंतर सुलोचनाबाई काही काळ मौन होत्या; पण नंतर त्यांच्या ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘कळीदार कपुरी पानं’ यांसारख्या काही लावण्या गाजल्या.

रेडिओ सिलोनवरील लोकप्रिय कलाकार

सुलोचना चव्हाण यांच्या आवाजाची योग्य दखल फक्त रेडिओ सिलोनने घेतली. त्यांची जवळपास पाऊणशे हिंदी गाणी आहेत, हे रेडिओ सिलोनमुळे संगीत श्रोत्यांना कळले. पाकिस्तान, बलुचिस्तान, ब्रह्मदेश आदी देशांतून त्यांच्या गाण्यांची फर्माईश होत असे. सुलोचना चव्हाण यांनी ‘माझं गाणं माझं जगणं’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यांचे शालेय जीवन, स्टुडिओच्या चकरा, अभिनय, गाण्याचे वेड, जीवनसाथी, विवाहानंतरचे आयुष्य, लावणी, हिंदी गाणी, लोकप्रियता अशा टप्प्यांमधील प्रवास या आत्मचरित्रामधून समोर येतो. त्याचबरोबर तो काळही समोर उभा राहतो.

महत्त्वाचे पुरस्कार

  • भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार

  • शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (२००९)

  • महाराष्ट्र सरकारचा ‘मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता पुरस्कार (१९६५)

  • संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (२०१०)

  • चिंचवडच्या रोटरी क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार

सोज्वळ आणि खानदानी

सोज्ज्वळपणा हे सुलोचना चव्हाण यांच्या लावणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. त्यात कधीही द्विअर्थी शब्द नसत. समाजाच्या प्रत्येक स्तरातील ऐकावे, अशी त्यांची गाणी होती. त्यामुळे दीदींनी लावणी घराघरांत पोहोचवली.

सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी

सुलोचना चव्हाण यांनी कधीही मेकअप केला नाही. कधीही ओठाला लिपस्टिक लावले नाही. मी तरी कधी पाहिले नाही. उलट डोक्यावर पदर घेऊन त्या लावणी गात असतं. त्यांच्या लावणीत, त्यांच्या आवाजात खानदानीपणा होता. त्यांचा आवाज पहाडी होता.सुलोचना दीदी अतिशय मोठ्या गायिका होत्या, त्यांचं या क्षेत्रात खूप मोठं नाव होतं. पण या नावलौकिकाचा त्यांना यत्किंचितही गर्व नव्हता. आपल्या श्रेष्ठत्वाचा अहंकार त्यांनी कधीच बाळगला नाही. कोणत्याही कलाकाराशी किंवा रसिकाशी त्या अतिशय आत्मीयतेने आणि आपुलकीने संवाद साधायच्या. माझी आणि दीदींची गाठभेट विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा झाली. एकदा १९९८ मध्ये कथक आणि लावणी असा नृत्य जुगलबंदीचा महोत्सव झाला होता.

यात सुलोचना दीदी पण आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मला दिलेला सल्ला आजही माझ्या लक्षात आहे. त्यावेळी मी नवखी होते. दीदी मला म्हणाल्या, ‘‘सुरेखा, तू चांगली कलावंत आहेस. तुझा आवाज देखील चांगला आहे. पण आता तुझी स्वतःची ओळख निर्माण कर. सुलोचना चव्हाण यांची लावणी सुरेखा पुणेकर चांगली गाते, असं लोक म्हणतात. पण इथे माझं नाव नाही, तुझं नाव यायला हवं. इतर गायिकांच्या लावण्या गायच्या असतात. पण त्यांचं अनुकरण करू नकोस. ती लावणी स्वतःची करून गा. तुझं स्वतःचं गाणं गायली, तर लोकांना ते आवडेल. तरच तुझं नाव होईल.’’ दीदींचा हा सल्ला मी अजूनही लक्षात ठेवला आहे. सुलोचना दीदींच्या जाण्याने लावणीच्या क्षेत्रातील हिरा निखळला आहे, अशी आज आमची भावना आहे. त्यांची गाणी पुढील अनेक वर्षे आपल्याला त्यांची आठवण करून देतील. दुसरी सुलोचना चव्हाण होणे नाही. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सूर हरपला. बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्‍तुपाठ सुलोचनाताईंनी घालुन दिला होता. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्‍यांनी ठसकेबाज स्‍वरात लावण्‍या सादर केल्‍या. चपळ, फटकेबाज शब्‍दांना आपल्‍या आवाजाच्‍या, सुरांच्‍या माध्यमातून ठसका व खटका देण्‍याचे काम सुलोचनाताईंइतके उत्तम कोणीही करू शकलेले नाही.

- सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री

मी त्यांना तीन-चार वेळा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भेटले होते. त्यांच्याबरोबर माझे चांगले संबंध जुळले होते. काही वर्षांपूर्वी त्या आणि त्यांचे पुत्र विजयदादा यांच्यासोबत स्टेजवर गायची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजते.

- वैशाली माडे, पार्श्‍वगायिका

‘लावण्यवती’ नावाचा आमचा महाराष्ट्रातला पहिलावहिला लावणीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात ताईंनी हजेरी लावली होती, लावण्याच्या कार्यक्रमातील माझं नृत्य बघून  ताईंनी खूप खूप कौतुक केले होते. त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायलाही मिळालं. त्या नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करायच्या.

- मेघा घाडगे, अभिनेत्री

सुलोचनाताई माझ्या गुरू होत्या. एक गुरू म्हणून अगदी प्रेमाने आणि मायेने एखाद्या आईसारखे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. आम्ही त्यांना काही कार्यक्रमात गुरू म्हणून बोलवत असू आणि आपले घर समजून त्या नेहमी आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायच्या.

- मोनिका ठक्कर, लोककला अभ्यासक