31 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन ठाण्यात

श्रीकांत सावंत  
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या 31 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी होणार आहे. 

ठाणे - जैवविविधतेने नटलेल्या ठाणे खाडी किनाऱ्याचे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे आकर्षण स्थलांतरीत पक्ष्यांना जितके असते तितकेच आकर्षण पक्षीमित्रांना दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पक्षी संमेलनाचे असते. यंदाचे राज्यस्तरीय 31 वे पक्षीमित्र संमेलन ठाण्यात भरत असून 25 आणि 26 नोव्हेंबरचा विकेंण्ड ठाणेकरांसाठी पक्षीमित्रांच्या सहवासात जाणार आहे. 

होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी होणार असून त्यानंतर सलग विविध पक्षी तज्ज्ञांच्या अनुभवांचा उलगडा ठाण्यात होणार आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या निर्मितीमध्ये भुमिका बजावणारे ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ताजी उगावकर हे असणार आहे.

ठाण्याच्या खाडी किनाऱ्यावरील समृध्द जैवविविधता स्थलांतरीत पक्षांना आकर्षित करत असताना होप संस्थेने पक्षीमित्र संमेलनाच्या आयोजनाच्या निमित्ताने पक्षी मित्रांनाही ठाण्याकडे आकर्षित केले आहे. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मावळत्या संमेलनाचे अध्यक्ष विजय दिवाण, नवे अध्यक्ष दत्ताची उगावकर यांच्यासह ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जैस्वाल उपस्थित राहणार आहेत. यावेळी होपच्या डॉ. दिपा राठी, डॉ. माधुरी पेजावर आणि पक्षीमित्र संस्थेचे भाऊ काटदरे संमेलनाची प्रस्तावना करतील. डॉ. सुधीर गायकवाड-इनामदार यांचे पुस्तक तर डॉ. राजू कोसंबेकर यांच्या ई-बुकचे प्रकाशन केले जाईल. तर उद्घाटक म्हणून उपस्थित प्रमुख वक्ते डॉ. उल्हास राणे यांचे शहरी पक्षांचे संवर्धन या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर डॉ. प्रकाश गोळे स्मृती व्याख्यानमालेत बीएनएचएसचे डॉ. दिपक आपटे यांचे देखील व्याख्यान होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सलग कार्यक्रमाचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.    

पक्षीमित्र संमेलनाची पार्श्वभूमी
दुर्बिण या साधनाने मध्यमवर्गीय समाजामध्ये पक्षी निरिक्षणाचा छंद रुजवला आणि अवघ्या काही वर्षांमध्ये तो संपुर्ण महाराष्ट्रभर वाढीस लागला. नव्या दमाचे अनेक पक्षीमित्र यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये निर्माण झाले आणि त्यांना एकत्र करण्याच्या दृष्टीने पक्षीमित्रांचा एक सोहळा सुरू झाला. 1982 साली महाराष्ट्रातील पक्षीमित्रांनी एकत्र येऊन नागपूर नगरीमध्ये पहिले पक्षीमित्र संमेलन भरवले होते. त्यानंतर या संमेलनाची श्रृंखला पुढे सुरू झाली. यावेळी 31 वे राज्यस्तरीय पक्षीसंमेलन आयोजनाचा मान ठाणे शहराला मिळाला असून हिअर ऑन प्रोजेक्ट एन्व्हॉयर्नमेंट (होप) नेचर ट्रस्ट या संस्थेने मुख्य आयोजनाची जबाबदारी स्विकारली आहे. 

संमेलनात काय काय?
ठाणे खाडी किनाऱ्याचे वैशिष्ट्य 'फ्लेमिंगो' असल्यामुळे या संमेलनाचे मुख्य आकर्षण 'फ्लेमिंगो' अर्थात 'अग्निपंख' पक्षी असणार आहे. त्याची माहिती देणारे अग्निपंख ही स्मरणिका या संमेलनामध्ये प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये फ्लेमिंगोची परिपुर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर डॉ. सुधीर गायकवाड-इनामदार यांचे 'ठाण्याचे पक्षीवैभव' या ठाण्यातील पक्षांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. शिवाय गडकरीच्या तालिम हॉलमध्ये संमेलनाच्या निमित्ताने घेतलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तर गडकरीच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेमध्ये वेगवेगळ्या संस्थांचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये बीएनएचएस, मॅंग्रोव्ह फाऊंडेशन, ठाणे महापालिका, याशिवाय पक्षींची कृत्रिम घरटी, पक्षांविषयीची पुस्तके, साहित्य आणि निसर्ग आणि पक्षांविषयीची साहित्याची विक्री इथे केली जाणार आहे. 

संमेलनात सहभागी कसे व्हाल? 
संमेलनाची नोंदणी गेली महिनाभरापासून सुरू असून संमेलनस्थळी पोहचल्यानंतरही नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. सभासद नोंदणी करून सहभागी होणाऱ्यांना संमेलन किट, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. निवासाची व्यवस्थाही या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आली आहे.  

 

Web Title: marathi news 31 State Level Bird Meetings in Thane