प्राण्यांमध्ये मूत्रपिंड निकामी हाेण्याच्या प्रमाणात वाढ

हर्षदा परब  
शनिवार, 10 मार्च 2018

मुंबई - अन्नपदार्थांच्या चुकीच्या सवयीमुळे पाळीव प्राण्यांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रथिनेयुक्त डाएट आणि पाकीटबंद अन्नामुळे  मूत्रपिंड निकामी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती परळ येथील बैलघोडा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी दिली.

मुंबई - अन्नपदार्थांच्या चुकीच्या सवयीमुळे पाळीव प्राण्यांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रथिनेयुक्त डाएट आणि पाकीटबंद अन्नामुळे  मूत्रपिंड निकामी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती परळ येथील बैलघोडा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी दिली.

बैलघोडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या प्राण्यांपैकी २५ ते ३० टक्के प्राण्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे आढळते, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्‍टर, ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे सचिव आणि बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रूॲलिटी टू ॲनिमल रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जे. सी. खन्ना यांनी दिली. प्राण्यांना पाकीटबंद अन्न दिले जाते, जे प्रथिनेयुक्त असते; मात्र प्राण्यांचा व्यायाम होत नाही, तसेच या अन्नामुळे पचनाचा त्रास होतो. त्यामुळे प्राण्यांच्या मूत्रपिंडावर ताण येतो, असे डॉ. खन्ना यांनी सांगितले.

बीएसपीसीए रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. सचिन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा मूत्रपिंड पूर्ण निकामी झाल्यावर या प्राण्यांना बीएसपीसीएमध्ये आणले जाते. स्थानिक डॉक्‍टरांकडून सुरू असलेल्या उपचारांना प्रतिसाद न दिल्याने प्राण्यांची प्रकृती बिघडली की त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. अनेकदा तपासण्या आणि चाचण्यांनंतर प्राण्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे निदान होते, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. पूर्वी वयोवृद्ध प्राण्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे लक्षात यायचे; मात्र वयाचे हे प्रमाण आता कमी झालेले आहे, असे डॉ. खन्ना यांनी सांगितले.

चॉकलेट म्हणजे प्राण्यांसाठी विष
चॉकलेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या चॉकोतील विशिष्ट रसायन हे प्राण्यांसाठी विष असते. ते प्राण्यांना पचवता येत नाही. सतत चॉकलेट खाल्ल्याने प्राण्यांना त्रास होतो. तसेच त्यांचे मूत्रपिंड निकामी होऊ शकतात, अशी माहिती डॉ. सचिन राऊत यांनी दिली.

सैन्य दल, नौदल, हवाई दलात काम करणाऱ्या श्‍वानांची नियमित तपासणी केली जाते. आवश्‍यकता असल्यास चाचण्याही केल्या जातात. त्यामुळे त्यांच्या आजाराचे वेळेत निदान होते. पाळीव प्राण्यांमध्येही काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. एकदोन दिवसांतच तपासण्या आणि चाचण्या व्हायला हव्यात.
- डॉ. जे. सी. खन्ना, बैलघोडा रुग्णालय

डायलिसिस मशीनचा वापर
रुग्णालयात श्‍वान आणि मांजरांवर डायलिसिस करण्यासाठी लहान मुलांच्या डायलिसिस मशीनचा वापर केला जातो. दिवसाला किमान ३ प्राण्यांचे डायलिसिस होते. प्राण्यांमध्ये अद्याप प्रत्यारोपण हा पर्याय नसल्याने प्राण्यांना या त्रासदायक उपचारांचा सामना करावा लागतो.

मूत्रपिंड निकामी झाल्याची लक्षणे
 जेवण कमी होणे किंवा थांबवणे
 उलट्या होणे, लघवी न होणे
 अन्न न पचणे, थोड्या थोड्या वेळाने लघवी होणे
इन्फोबॉक्‍स २-
 रुग्णालयात वर्षाला १२ हजार प्राणी उपचारांसाठी येतात
 त्यातील २५ ते ३० टक्के प्राणी 
मूत्रपिंड निकामी झालेले
 मांजरांपेक्षा श्‍वानांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण अधिक
प्राण्यांसाठी हे करा...
 जो आपण खातो, तो संतुलित आहार द्या
 प्राण्यांची रपेट, व्यायाम वाढवा
 नियमित तपासणी करा, चाचण्या करा

हे टाळा...
 पाकीटबंद अन्न टाळावे
 बेकरी उत्पादने (खास प्राण्यांसाठीची 
बिस्किटे योग्य)
 चॉकलेट, आईस्क्रीम कटाक्षाने टाळावे

Web Title: marathi news kidney failure in animals mumbai