ठाणे स्थानकातील दुचाकींचे पार्किंग थेट फलाटांवर

श्रीकांत सावंत
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

ठाणे : मध्य रेल्वेच्या फेरीवाल्यांना हटवून रेल्वे आणि महापालिका प्रशासन प्रवाशांना रेल्वे स्थानकातील प्रवेश सुखकर करून देण्याचा प्रयत्न करत असताना शहरातील बेशिस्त दुचाकीस्वारांनी प्रशासकीय व्यवस्थेला वाकुल्या दाखवत थेट रेल्वे फलाटांवर दुचाकीपार्किंग करण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे.

ठाणे : मध्य रेल्वेच्या फेरीवाल्यांना हटवून रेल्वे आणि महापालिका प्रशासन प्रवाशांना रेल्वे स्थानकातील प्रवेश सुखकर करून देण्याचा प्रयत्न करत असताना शहरातील बेशिस्त दुचाकीस्वारांनी प्रशासकीय व्यवस्थेला वाकुल्या दाखवत थेट रेल्वे फलाटांवर दुचाकीपार्किंग करण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे.

विशेष म्हणजे दररोज या दुचाकींमध्ये वाढ होऊ लागली असून पुढील काही दिवसांमध्ये स्थानकातून पश्चिमेकडील तिकीट घराकडे बाहेर पडण्याचा रस्ताच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानकातील पार्किंग प्लाझाच्या बाजुने हे दुचाकीस्वार थेट फलाटांवर पोहचल्यामुळे घाईघाईने लोकलमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा मार्गच बंद झाला असून प्रवाशांच्या गैरसोईमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फलाटांवर वाहतूक पोलीस आणि महापालिकेची टोईग वाहनही पोहचू शकणार नसल्यामुळे कारवाईचीही भीती या दुचाकीस्वारांना राहिलेली नाही.

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीस पुला खालील भागाचा एअरपोर्टच्या धर्तीवर विकास करण्याचा विडा उचललेल्या महापालिकेने या भागात दुचाकीस्वारांना प्रवेश बंदी केली आहे. तर स्थानकाच्या फलाटाच्या बाजुचा मार्ग वाहनांसाठी कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश वाहतुक पोलीसांकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे या भागात दुचाकी येणार नाही असा भोळा समज असलेल्या ठाणेकरांना दुचाकीस्वारांच्या बेशिस्त आणि मनमानी पणाचा फटका बसला असून फलाट क्रमांक दोनच्या बाजुला थेट फलाटांवरच गाड्या उभ्या करण्याची सुरूवात या दुचाकीस्वारांनी केली आहे.

ठाणे स्थानकातील पार्किंग प्लाझाच्या तळमजल्यावर पार्किंग फुल झाल्यानंतर त्याची वाढ स्टेशनच्या फलाटाच्या दिशेने सुरू होऊन दिवसभर वाढतच जाते. या पार्किंगमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर तिकीट काढून झाल्यानंतर स्थानकात जाण्यासाठी अडथळा झाला आहे. तसेच स्थानकातून फलाट क्रमांक एकवर गाडी आल्यानंतर या गाड्यांमुळे अरुंद जागेतून प्रवाशांना बाहेर पडावे लागत असल्यामुळे या भागात चेंगराचेंगरीची शक्यता पुर्वीपेक्षा अधिक झाली आहे. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारीही उघड्या डोळ्यांनी हे अतिक्रमण पाहत असून त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत. 

टोईंग वाहन येणार नसल्यामुळे बिंधास्त...    
फेरीवाल्यांना हटवल्यामुळे मोकळ्या स्थानकाचा अनुभव घेणाऱ्या प्रवाशांना पार्किंगच्या अडथळ्याने मात्र वाट अडवून धरली आहे. दिवसभर दुचाकीच्या पार्किंगच्या अडथळ्यात अधिकच भर पडत जाते. या भागामध्ये टोईंग व्हाॅन येण्याची शक्यता नसल्यामुळे मनमानीपणे पार्किंग केली जात आहे. या पार्किंगमुळे स्थानकातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांचा रस्ता बंद झाला आहे. तसेच तिकीट खिडक्यांमधून तिकीटे काढून स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग अडवला आहे. या भागातील वाहतुक पोलीसंची चौकीच गेल्यामुळे बेशिस्त दुचाकीस्वारांचा उपद्रव जोरात सुरू झाला आहे. स्थानक व्यवस्थापकांना तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवासी हवालदिल आहेत.
नंदकुमार देशमुख, रेल्वे प्रवासी संघटना

आरपीएफ आणि शहर पोलीसांना कारवाईची विनंती...
स्थानक परिसरातील दुचाकीच्या पार्किंगवर कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि ठाणे शहर पोलीसांची वाहतुक शाखेला पत्र देऊन या पार्किंगवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. हा परिसर आमच्या हद्दीमध्ये येत नाही. 
उत्तम सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे 

प्रशासनाकडून प्रतिसाद नाही...
ठाणे स्थानकातील बेशिस्त दुचाकी गाड्या वाढत असताना प्रशासनाकडून मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे दिसून येत होते. याविषयी रेल्वेचे स्थानक व्यवस्थापक एस. बी. महिधर, वाहतुक उप आयुक्त अमित काळे आणि नौपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमलता शेरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Thane News Thane Railway Station