सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाटीसाठी बॅगमॅन

अक्षय गायकवाड
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

काही विकसित राष्ट्रांमध्ये सॅनिटरी पॅड जाळून नष्ट करुन वायुप्रदूषण वाढविले जाते. रोगराईचा धोकाही यामुळे वाढतो. कोळी यांनी या सर्व परिस्थितीचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन प्रोजेक्ट रेड डॉट हा सामाजिक उपक्रम 26 जानेवारीपासून सुरु केला आहे.

विक्रोळी - सॅनिटरी पॅड वापरुन झाल्यानंतर त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावता यावी, यासाठी बॅगमॅन मदतीसाठी धावून आला आहे. विकास कोळी या बॅगमॅनने लाल रंगाचे वर्तुळ असलेल्या पिशवीचा प्रयोग त्यासाठी करत त्या पिशव्या वापरण्याचे आवाहन केले आहे. काही संस्थामार्फत सॅनिटरी पॅड मोफत देखील जातात. पण सॅनिटरी पॅड, निरोध, डायपर त्याचे विस्थापन कसे करावे याचा विचार कुणीच करत नाही. 

पॅड वापरल्यानंतर कचरा कुंडीत किंवा कुठेही उघड्यावर फेकले जातात हि गोष्ट आरोग्याच्या दृष्टिने हानीकारक आहे. या गोष्टींची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे. नेमकी हीच बाब विकास कोळी यांनी हेरली. काही विकसित राष्ट्रांमध्ये सॅनिटरी पॅड जाळून नष्ट करुन वायुप्रदूषण वाढविले जाते. रोगराईचा धोकाही यामुळे वाढतो. कोळी यांनी या सर्व परिस्थितीचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन प्रोजेक्ट रेड डॉट हा सामाजिक उपक्रम 26 जानेवारीपासून सुरु केला आहे. या उपक्रमामार्फत स्रियांनी मासिकपाळी करीता वापरण्यात येणाऱ्या साधनांची विल्हेवाट लावण्याकरिता त्यांनी लाल रंगाचे वर्तुळ असलेल्या पिशवीचा वापर करावा. नंतर त्या पिशवीला सील करून ती पिशवी इकडे तिकडे न फेकता कचरा कुंडीतच फेकावी. त्यामुळे ते उघड्यावर पडणार नाही. सफाई कामगारांना देखील ते वेगळे करताना त्याचा त्रास होणार नाही. ज्यामुळे सगळ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील. व्यवस्थितपणे विल्हेवाट लावली नाही तर त्यामुळे अनेक जीवघेण्या आजारांचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे शहराचे आणि पर्यायाने देशाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. स्त्री जर सक्षम आणि निरोगी असेल तरच भावी पिढी भक्कम बनू शकेल. या उपक्रमाची सुरवात २६ जानेवारी 2018 रोजी 1 लाख पिशव्यांचे मोफत वाटप करून करण्यात आलेली आहे. सामाजिक उपक्रम आपल्या शहरात राबवायचा असेल तर फेसबुकवर #Projectreddotindia येथे Follow करा किंवा www.ProjectRedDot.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि हा उपक्रम मोठा बनविण्यास हातभार लावा. या Project Red Dot ला भारतभर पसरण्यासाठी 8080 477 477 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Marathi News Mumbai sanitary napkin disposal bagman