सामान्यांना सहज पासपोर्ट मिळावा हा पंतप्रधानांचा प्रयत्न : रावसाहेब दानवे

अक्षय गायकवाड
शुक्रवार, 2 मार्च 2018

विक्रोळी : सामान्य माणसाला ही विमानप्रवास करता याव तसेच त्याला सहजरित्या पासपोर्ट मिळावा असा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्यासाठीच छोट्या छोट्या विभागात पासपोर्ट कार्यालय सुरू केले जात आहे, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केले.

कन्नमवार नगरमधील टपाल कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्राच्या उदघाटनावेळी ते बोलत होते. "येत्या काळात देशातील अंतर्गत हवाई वाहतूक वाढणार आहे. त्यासाठी देशातील विमान कंपन्यांनी 900 नवी विमाने आगाऊ राखून ठेवली आहेत" अशी माहितीही त्यांनी दिली. 

राणे दिल्लीत होते परत आले
नारायण राणे काल दिल्लीत होते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच राणे दिल्लीत होते आणि परत आले, असे उत्तर दानवे त्यांनी दिली. ते असे बोलताच एकच हशा पिकला. राणे यांच्याबद्दल जास्त बोलणे त्यांनी टाळले.

खासदार किरीट सोमय्या, चीफ मास्टर जनरल हरिशचंद्र अग्रवाल, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी भाजप मुंबई उपाध्यक्ष, माजी आमदार मंगेश सांगळे यावेळी उपस्थित होते.

5 मार्चपासून पासपोर्ट केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रामुळे वरळी, अंधेरी, ठाणे या पासपोर्ट कार्यालयाचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे. आता पूर्व उपनगरातील नागरिकांचा वेळ या केंद्रामुळे वाचणार आहे.

मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, पवई, विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द, कुर्ला  येथील नागरिकांना या केंद्राचा फायदा होणार आहे. अंदाजे 42 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. 

पासपोर्ट सेवेच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून येणाऱ्या नागरिकांच्या अर्जाची छाननी, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम पोस्टात होणार आहे. यामुळे पूर्व उपनगरातील नागरिकांना त्यांचा जवळपासच अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. 4 दिवसात घरपोच पासपोर्ट मिळणार आहे. तात्काळ पासपोर्टची सुविधा या केंद्रावर उपलब्ध नसणार आहे. 

ध्वनीवर्धक केला बंद
या कार्यक्रमापासून काही अंतरावरच दहावीचे विकास हायस्कुलचे परीक्षा केंद्र होते. पाहुण्यांचा भाषणासाठी आणि पासपोर्ट केंद्राची माहिती देण्यासाठी ध्वनीवर्धक लावण्यात आले होते. ध्वनीवर्धकाचा आवाज मोठा असल्यामुळे घुमू लागला. याची दखल शाळेच्या संचालकानी या कार्यक्रमात धाव घेतली आणि स्पीकर बंद करण्याची विनंती केली आणि आयोजकांनी तातडीने आवाज बंद केला. 

शिवसेनेची कार्यक्रमाला दांडी
शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील राऊत यांचे नाव कोनशीलेवर होते. ईशान्य मुंबईत शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात विळ्याभोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे आमदार राऊत तसेच अन्य कोणी शिवसैनिक या कार्यक्रमाकडे फिरकले देखील नाहीत.

Web Title: marathi news Narendra Modi Raosaheb Danve Passport office Vikroli