पश्‍चिम रेल्वेवर "ग्रीन स्थानके'! पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाचा उपक्रम

पश्‍चिम रेल्वेवर "ग्रीन स्थानके'! पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाचा उपक्रम

मुंबई  : पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आणि संवर्धनासाठी पश्‍चिम रेल्वेचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकाला "ग्रीन स्थानक' बनवले जात आहे. लवकरच पश्‍चिम रेल्वेवरील इतर स्थानकांवर पर्यावरणपूरक सामग्रीचा पुरवठा होणार आहे. प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने स्थानकात प्लास्टिक बॉटल क्रशर यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी मुंबई सेंट्रल स्थानकात मशीन बसवण्यात आल्या आहेत. उर्वरित 15 रेल्वेस्थानकांतही क्रशर यंत्र कार्यान्वित करण्यात येत आहे. 

हरित ऊर्जेच्या वापरासाठी जागतिक पातळीवरून मोठे प्रयत्न केले जात आहेत. भारतीय रेल्वे प्रशासनाकडून त्यासाठी पुढाकार घेतला आहे. रेल्वेच्या एकूण विजेपैकी काही प्रमाणात ऊर्जा सौर किंवा हरित ऊर्जेद्वारे तयार करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेकडून सुरू आहे. त्या प्रयत्नांमधून ग्रीन स्थानक ही संकल्पना पुढे आली. यामध्ये प्लास्टिक वस्तूंना बंदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गाड्यांमध्ये, रेल्वे स्टॉलवर आता कागदी कप दिसून येतात. 

पश्‍चिम रेल्वेस्थानकांवर प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिक बॉटल क्रशर यंत्र बसविली आहेत. चर्चगेट (4), लोअर परळ (1), प्रभादेवी (1), दादर (2), माटुंगा रोड (1), माहीम (1), वांद्रे (1), वांद्रे टर्मिनस (2), अंधेरी (2), मालाड (1), कांदिवली (1), बोरिवली (2), वसई रोड (1), नालासोपारा (1) आणि विरार (1) या स्थानकांवर यंत्र सुरू करण्यात येत आहेत. प्लास्टिकचा कचरा पर्यावरणपूरक पद्धतीने कमी करणे, पुनर्वापर करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश रेल्वे मंडळाने दिले आहेत. ग्रीन स्थानकासाठी प्रत्येक स्थानकावर सौरऊर्जा प्लेट बसविण्याचे काम सुरू आहे. मुंबई टर्मिनस येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प केला आहे. यासह वांद्रे येथे पाणी पुनर्वापर प्रकल्प सुरू आहे. मुंबई विभागातील विहिरी पुनरुज्जीवित केल्या जात आहेत, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

ग्रीन रेल्वेस्थानकात पाणी, वीज वाचविण्यावर भर दिला जातो. कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे विघटन केले जाते. स्थानकाच्या आकारानुसार स्थानकाला ग्रीन करण्यासाठी अवधी लागेल. ग्रीन स्थानक करून पश्‍चिम रेल्वेला थेट कोणताही महसूल मिळणार नाही; मात्र पाण्याचा पुनर्वापर, सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे पैशांची बचत होणार आहे. ग्रीन स्थानकामुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल. प्रवाशांना पर्यावरणपूरक उत्तम सुविधा मिळेल. 
- सुमित ठाकूर,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्‍चिम रेल्वे

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi train latest Green Stations mumbai central environmental conservation live 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com